मुंबई / नगर सह्याद्री –
मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र केला आहे. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. तर, मराठा समाजातील इतर आंदोलकांनी मनोज जरांगेंविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. मनोज जरांगेंच्या कालच्या वर्तनामुळे मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम होईल, अशी भीता मराठा आंदोलक अजय बारस्कर यांनी व्यक्त केली आहे. तसंच, मनोज जरांगेंना विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांचं त्यांच्याकडून खंडन झालं नसल्याचंही ते म्हणाले.
“आमच्या गावकऱ्यांचे, मराठा समाजातील बांधवाचे फोन आले. त्यांनी सांगितलं की महाराज समाज एक झालाय त्यासाठी आपण थांबायला हवं. आपण थांबूही. पण माझ्यावर व्यक्तिगत आरोप मनोज जरांगेंनी केले आहेत, त्यामुळे त्यांनी चॅनेलसमोर माफी मागावी. पण त्यांनी अद्याप माफी मागितली नाही. पहिल्या पत्रकार परिषदेतील प्रश्न आरक्षणासंदर्भात होते, त्यांनी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांच्या कोणत्याही प्रवक्त्याने, मराठा समाजाच्या कोणत्याही अभ्यासक, समर्थकांनी एकाही प्रश्नाचं खंडन केलं नाही”, असं अजय बारस्कर म्हणाले.
“मनोज जरांगेंचं नेतृत्त्व सर्वांनी मान्य केलं होतं. त्यांनी ओपन चर्चा मान्य केली होती. परंतु, या नियमाचा भंग झाला. जरांगेंनी सातत्याने भूमिका बदलल्या. त्यांचं नेतृत्त्व अपरिपक्व आहे. प्रचंड प्रमाणात शिवीगाळ, ट्रोल, जीवे मारण्याच्या धमक्या, जीव मारण्याचे प्रयत्न असे प्रकार झाले. मी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी अनेक मराठा समाज सहमत आहे”. परंतु, सत्य भूमिका, आपण लोकशाहीत राहतो आणि प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे”, असं जरांगे म्हणाले.
“माझ्यावर बलात्कार, विनयभंगासारखे आरोप केले. मी म्हटलं पुरावा द्या. एकही पुरावा दिला नाही. मी नार्को, ब्रेन मॅपिंगसारख्या टेस्ट सर्वांसमोर द्यायला तयार आहे. परंतु, या भूमिकेचंही खंडन करता आलं नाही. विवेकी माणसं कालच्या प्रकाराला तमाशा म्हणतील. नेतृत्त्वाची अपरिपक्वता देशासोमर आली. तुमच्यावर एकही नेता टीका करत नव्हता. परंतु, कालपासून तुमच्यावर टीका व्हायला लागली. हा तुमचा अपमान नसून तुमच्या मागे असलेल्या समाजाचा अपमान आहे. तुमच्यामुळे समाजाला खालच्या दर्जाची वागणूक मिळायला लागली. काय चूक होती आमची. का घाबरता मला. काय कारण?, असे अनेक प्रश्न बारस्करांनी आज पुन्हा विचारले.
“काल तुम्ही जातीवरून शिव्या दिल्या, सरकारकडून काम करून घ्यायचं असेल तर व्यवस्थित सभ्य भाषेत सांगावं लागतं, चालावं लागतं. करेक्ट कार्यक्रम कोणाचा झाला? समाजाच्या मागे असणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होतोय. ३०-४० हजार कुणबी नोंदी सापडल्या फक्त. सरकारची इच्छाशक्ती असेल तरच यंत्रणा काम करते. सरकार आणि प्रशासनाची इच्छा असल्यावर काय होऊ शकतं. आपण चुकलात जरांगे पाटील. काय मी म्हणत होतो, कशासाठी तुमच्याकडे आलो होतो. आपण जातीच्या प्रमाणपत्राबरोबर कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून देणार.पण हे रागाच्या भरात उठले, तमाशा केला. तुम्हाला विचार करता आला नाही. “तुका म्हणे आधी करावा विचार, शूरपणे तिर मोकलावा” आधी विचार करायचा आणि मग बाण सोडावा. पण हा आधी बाण सोडतो मग विचार करतो”, अशी टीकाही त्यांनी केली.