अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी चार शाखा 23 मे पासून बंद करण्यात येणार आहेत. दैनंदिन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.
बंद होणाऱ्या शाखांमध्ये संगमनेर, बेलापूर, नगर मार्केट यार्ड व केडगाव (इंडस्ट्रीयल इस्टेट) या चार शाखांचा समावेश असून या सर्व शाखांचे कामकाज नगर – मुख्य शाखेतून होणार आहे.बंद होणाऱ्या शाखांमधील खातेदार लॉकर धारकांनी आपल्या लॉकर मधील वस्तू काढून घेऊन लॉकरच्या चाव्या बँक प्रशासनाकडे सुपूर्द कराव्यात असे आवाहन देखील बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यापूवही काही शाखा बंद करण्यात आल्या आहेत. बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून डीआयसीजीसी व केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या नियमानुसार व आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व ठेवीदारांनी केवायसीची पूर्तता करून आपले क्लेम फॉर्म नजीकच्या शाखेमध्ये लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.