अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय १० महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे.
दरम्यान, अष्टविनायक मंदिरासाठी 147 कोटी रुपये, तुळजापूर मंदिरासाठी 1865 कोटी रुपये, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी 275 कोटी रुपये, सोबतच विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी 829 कोटी रुपये, असे एकूण 5 हजार 520 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलीय. सोबतच मुलींचे स्वतंत्र आयटीआय देखील असणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यात महिला सक्षमीकरणासाठी सरकार आदिशक्ती अभियान राबवणार आहे. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जागृती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले तेच काम आमचं सरकार करणार आहे. अहिल्यादेवींचे जीवन आणि कार्याचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तो चित्रपट बहुभाषिक असेल. शिवाय हा केवळ जीवनपट नसेल तर प्रभावी मांडणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
परक्रियांच्या आक्रमणामुळे आमची श्रद्धास्थानं नष्ट करण्यात आली. मात्र त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम अहिल्यादेवींनी केलं. आज बैठकीच्या निमित्ताने चौंडीला स्मृतीस्थळाचे जतन करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मान्य केलाय. अखिल भारतीय स्थरावर प्रेरणा आणि तीर्थस्थळ तयार झाले पाहिजे, असं काम आपण केलंय. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिला केंद्रीत एनजीओ उभा करण्याचे काम हाती घेतले आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा यासाठी यशवंत योजना सुरु केली आहे. आता 10 हजार विद्यार्थी आपण यातून शिकवणार आहोत. सोबतच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना सुरु करत आहोत.अशी महत्वपूर्ण घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
राज्य मंत्रिमंडळातील इतर निर्णय
1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार
– महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार
– व्यवसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करुन देणार
2) राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार/आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार
– राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार
– कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाजनिर्मिती, अनिष्ठ रुढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास
– हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणार्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार
– हे अभियान राबविण्यासाठी 10.50 कोटी रुपये खर्च करणार
3) धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव.
‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविणार
– दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण
– आतापर्यंत यासाठी 288.92 कोटी रुपये वितरित
– राजे यशवंतराव होळकर यांनी 1797 ते 1811 या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे ही योजना
4) धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव
– राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह
– प्रत्येकी 200 क्षमतेची ही वसतीगृह असणार. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर, मुलींसाठी 100 क्षमतेचे.
– नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह
– नाशिक येथे काम सुरु, पुणे, नागपूर येथे लवकरच सुरु होणार
– या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव
5) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार
– राज्यात असे 3 ऐतिहासिक तलाव (चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी)
– राज्यात अशा 19 विहिरी
– राज्यात असे एकूण 6 घाट
– राज्यात असे एकूण 6 कुंड
– अशा एकूण 34 जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभिकरण इत्यादी कामे करणार
– यासाठी 75 कोटी रुपये खर्च करणार
6) अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार
– या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल.
– यासाठी 485.08 कोटी खर्च करणार
– जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा, मनुष्यबळासह यासाठी देणार
7) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून 5503.69 कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे
– चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : 681.32 कोटी
– अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार: 147.81 कोटी
– श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा : 1865 कोटी
– श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा : 259.59 कोटी
– श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा: 275 कोटी
– श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा : 1445.97 कोटी
– श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा : 829 कोटी
– 8) अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरु करणार
– 9) राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय
– 10) ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी 2022-25 ऐवजी 2028 पर्यंत वाढविण्याचा निर्णय
– 11) नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-2025 जारी करण्याचा निर्णय