मराठा आरक्षण आंदोलनातील तोडफोड, जाळपोळ अन् कायदा हातात घेणं थांबण्याची गरज
मराठ्यांनो; पाटीदार समाज, जाट समाज अन् किसान मोर्चा आंदोलनाच्या मार्गावर मराठा आरक्षण आंदोलन जाऊ द्यायचे का?
सारिपाठ । शिवाजी शिर्के –
गुजरातमध्ये सन २०१५ मध्ये पाटीदार समाजाने आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन केलं होतं. आंदोलन चिघळल्यानंतर, त्यात ११ जणांचा बळी गेल्यानंतर, जाळपोळ अन् आंदोलन चिघळल्यानंतर गुजरात सरकारने हे आंदोलन चिरडून टाकलं. हार्दिक पटेल यांचं पुढं काय झालं हेही सर्वश्रूत आहे. आंदोलनात अटक करण्यात आलेले तरुण आजही तुरुंगात खितपत पडलेले आहेत. पुढे २०१६ मध्ये हरियानामध्ये जाट समाजाने आरक्षणाच्या मुद्यावर केलेल्या आंदोलनाचेही तेच झाले. दिल्लीत किसान मोर्चाच्या वतीने शेतकर्यांचं आदोलन झाले. आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही अन् आंदोलन चिघळले. आंदोलनात शेतकरी सहभागी नसल्याचा कांगावा केला गेला अन् अश्रुधुराच्या नळकांड्यांपासून सारी अस्त्र सरकारने वापरली. आंदोलन चिरडून टाकण्यात आलं. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेले आंदोलन भरकटलं जातेय की काय अशी शंका येऊ लागली आहे. लाखोंच्या संख्येने अत्यंत शाततेने याच मुद्यावर ५८ पेक्षा जास्त मोर्चे झाले. संपूर्ण जगाने त्याची नोंद घेतली. मात्र, गेल्या चार दिवसात याच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात सुरू असलेली जाळपोळ, कायदा हातात घेण्याचे प्रकार पाहता सरकारकडून हे आंदोलन चिरडले जाण्याचीच शक्यता अधिक निर्माण झाली आहे. आंदोलनातील नेतृत्व झुकत नसेल तर ते नेतृत्व विकत घेतलं जातं हा इतिहास आहे आणि नेतृत्व विकत घेता आलं नाही तर त्या आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं हे गुजरातमधील पाटीदार, हरियाणातील जाट समाजाच्या आंदोलनातून जसं पुढं आलं तसंच ते किसान मोर्चाच्या आंदोलनातून देखील पुढं आलं. राज्यातील मराठ्यांच्या आंदोलनाचं तसं होऊ द्यायचं नसेल तर कायदा हातात घेणं थांबलंच पाहिजे. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू राहिलं तर या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही!
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटलांनी पुढाकार घेतला अन् आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटवलं. सनदशीर मार्गाने त्यांनी आपला लढा उभा केला आणि त्यांना राज्यभरातील मराठ्यांनी डोक्यावर घेतलं. नेतृत्व तयार व्हायला काही वर्षे लागतात. सामान्य कुटुंबातून आलेल्या मनोज जरांगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मराठे एक झाले. जरांगे यांचं नेतृत्व झुकणारं जसं नाही तसंच ते विकणारं देखील नाही. त्यामुळेच सरकारची मोठी कोंडी झाली आहे. जरांगे यांच्या आंदोलनात एकही दलाल नाही हे देखील नोंद घेण्यासारखं आहे. कोणत्याही समाजाची अथवा समुहाची मोठी आंदोलने अभावानेच झाल्याचे दिसून येते. मात्र, ही मोठी आंदोलने जर उभी राहिली तर ती कशाप्रकारे बदनाम करुन चिरडून अन् मोडीत काढली जातात हे गुजरात, हरियानातील आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या आंदोलनातून स्पष्टपणे समोर आले आहे. राज्यातील मराठा आंदोलनाचं काहीसं तसंच करण्याचा कट शिजला जातोय का असाच काहीसा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
गुजरातमध्ये पाटीदार समाजाने २०१५ मध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.
आंदोलन शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने चालू होतं तोपर्यंत सरकारन काढूपणा केला. कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलले नाही आणि जसं जसं आंदोलन कर्त्यांचा संयम सुटत चालला तसं तसं आंदोलन उग्र झालं. आंदोलन चिघळल्यानंतर या आंदोलनामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. कित्येक वाहन जाळली गेली. हजारो दुकान फोडली गेली. जाळपोळीच्या घटनांनी आंदोलनाला उग्र स्वरूप धारण केलं. आंदोलनाला उग्र स्वरूप येताच सरकारने अवलंबलेले शांततेच व संयमाचं धोरण सोडून दिलं. या आंदोलनामुळे समाजाला आणि गुजरात राज्याला धोका निर्माण झाला असल्याचं जाहीर केलं. लागलीच आंदोलनात पोलीस घुसवले. राखीव पोलिस दलाच्या तुकड्या घुसवल्या अन् आंदोलन चिरडून टाकण्यास सुरुवात केली. आंदोलनाचं नेतृत्व करणार्या हार्दिक पटेल यांच्यावर देशद्रोहासह अन्य कलमान्वये अटकेची कारवाई केली अन् आंदोलन संपवून टाकण्यात आलं. सरकार एवढ्यावरच थांबलं नाही तर आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या हजारो तरुणांवर अटकेची कारवाई झाली. यातील काही तरुण आजही तुरुंगामध्ये आहेत तर काही तरुण अजूनही कोर्टकचेरीच्या पायर्या तुडवत आहेत.
हरियाणामध्ये जाट आरक्षणासाठी सन २०१६ मध्ये अशाच प्रकारचं आंदोलन झाले. तिथे सुद्धा अशाच प्रकारची जाळपोळ आणि तोडफोड व्हायला लागली. त्याचबरोबर सरकारने तिथं सुद्धा अशाच प्रकारे पोलीस कारवाई केली. आंदोलनाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले. नेत्यांना अटक केली अन् वेगवेगळ्या हजारो तरुणांवर केसेस करत हे आंदोलन चिरडून टाकलं. किसान मोर्चा म्हणजेच शेतकर्यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं. या आंदोलनातला नेतृत्व सुद्धा नव्हतं. सरकारने या आंदोलनाची बदनामी केली. आंदोलनामध्ये गरीब नाहीत, हे शेतकरी नाहीत असं म्हणत आंदोलनकर्ते पिझ्झा, बर्गर खातात अशी चर्चा घडवून आणली. आंदोलनाला बसलेले लोक हे भारतीय नसून खलिस्तानी असल्याचंही जाहीर केलं गेल आणि आंदोलन चिरडून टाकलं गेलं.
कोणतंही आंदोलन सरकारची डोकेदुखी ठरतेच! मराठा आरणक्षणाचं आंदोलनही त्याला अपवाद कसं असेल? आंदोलनामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं समोर येताच सरकार पोलिस बळाचा वापर करणार हे नक्की! गृहमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी हेच सांगितलं आणि इशारा दिला. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतही कायदा व सुव्यवस्थेचा मुद्या चर्चेत आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजच दिल्लीत बोलावून घेतलं! याचाच अर्थ सरकार आंदोलन चिरडून टाकण्याच्या मोडवर आलं आहे.
मराठा आंदोलकांनी जाळपोळ केली. मराठा आंदोलकांनी गाड्या फोडल्या. मराठा आंदोलकांनी कार्यालये फोडली. मराठा आंदोलकांनी आमदारांचे घर जाळले यासह अनेक बातम्या सध्या समोर येत आहेत. याच बातम्यांचा आधार घेत सरकार टोकाचं पाऊल उचलणार हे वास्तव सत्य आंदोलनकांनी समजून घेण्याची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्राला अशा प्रकारची जाळपोळ, अशा प्रकारची तोडफोड घातक असल्याचे कालच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतील सुर आहेत. याचाच अर्थ आंदोलन बदनाम करण्यास आता प्रारंभ झाला आहे. राज्यात याच मुद्यावर मराठ्यांचे ५८ मोर्च निघाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मग, असे असताना आताच हे सारं का घडत आहे? बीडमधील जाळपोळीच्या घटनेत ३० टक्के तरुण मराठेतर असल्याची माहिती राज्याच्या पोलिस महासंचालकांनीच जाहीर केली.
याचाच अर्थ हे आंदोलन बदनाम करण्याची सुपारी काही मंडळींनी घेतली आहे. आंदोलनातील जाळपोळीच्या, तोडफोडीच्या घटनांसह कायदा हातात घेण्याच्या घटना थांबल्या नाही तर दोन- तीन दिवसात सरकारने आंदोलन चिरडून टाकण्याच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतल्याचे समोर आल्यास आश्चर्य वाटू नये! अटकेपार झेंडा फडकविणार्या मराठ्यांनी षडयंत्र समजून घेण्याची गरज आहे. आताचं आंदोलन मोडीत काढलं गेलं तर पुन्हा असं आंदोलन उभे राहूच शकणार नाही. कारण, मनोज जरांगेंसारखं जिगरबाज नेतृत्व पुन्हा तयार होणार नाही. आंदोलन बदनाम करण्यासाठीचं षडयंत्र रचलं जात असताना संयमाची मोठी गरज आहे. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू राहिलं तर या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की!