अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नितीन अशोक घुले याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसेच, नितीनची आई शहाबाई अशोक घुले आणि वडील अशोक भुजंगराव घुले यांनी हा बालविवाह घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटना 7 सप्टेंबर 2022 ते 15 एप्रिल 2025 या कालावधीत शेकटे (ता. पाथड, जि. अहिल्यानगर) आणि निमगाव (ता. माळशिरज, जि. सोलापूर) येथे घडली. फिर्यादी मुलीने दिलेल्या जबाबानुसार, नितीनने तिला दारू पिऊन मारहाण केली, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या. माहेरी गेल्यावरही त्याने तिचा पाठलाग करून त्रास दिला.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बालविवाह कायदा 2006 आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.