अहमदनगर। नगर सह्याद्री-
महापालिकेच्या प्रशासकपदी अखेर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा लोकनियुक्त मंडळाची मुदत संपल्यामुळे प्रशासकपदी कोण, या प्रश्नावर यामुळे पडदा पडला आहे.
महापालिका लोकनियुक्त मंडळाची मुदत २७ डिसेंबरला मध्यरात्री संपुष्टात आली. राज्य निवडणूक आयोगाने तसे नगरविकास खात्याला कळविल्यानंतर लगेच हालचाली सुरू झाल्या. गुरूवारी व शुक्रवारी अनक्रमे स्थायी समिती सभा आणि महासभा रद्द करण्यात आल्या. या सभा रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
महापालिका आयुक्तांनी तातडीने अशा कोणत्याही सभा घेता येणार नसल्याचे आदेश गुरूवारी काढल्याने या सभा घेता आल्या नाहीत.सभा रद्द झाल्या मात्र महापालिकेवर प्रशासक कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात ‘मी प्रशासक झालो तर…’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे प्रशासक पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी यांच्याकडे की आयुक्तांकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यापूर्वी ज्या महापालिकांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले, तेथे तेथील आयुक्तांकडेच पदभार सोपविलेला आहे. येथेही यापेक्षा वेगळे होणे शक्य नव्हते. मात्र जिल्हाधिकार्यांच्या वक्तव्यामुळे उत्कंठा वाढली होती.
नगरविकास खात्याने २८ डिसेंबरला पत्र काढून प्रशासक म्हणून आयुक्त यांच्याकडे पदभार सोपवावा, असे म्हटले आहे. महापालिकेला हे पत्र गुरूवारी उशीरा प्राप्त झाले. त्यानंतर आयुक्त डॉ. जावळे यांनी प्रशासकपदाचा कार्यभार शुक्रवारपासून स्विकारला आहे.
सूत्रे हाती घेताच सर्व विभागाची झाडाझडती
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासक पदाची सूत्रे शासन निर्देशानुसार डॉ. पंकज जावळे यांच्याकडे देण्यात आले आहेत. या प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतात आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या सर्व विभागांना भेटी देऊन विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना आपापली प्रशासकीय कर्तव्य तत्परतेने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यावेळी डॉ. जावळे यांनी सर्व युवा प्रमुखांना आपापला विभाग व मनपा मुख्य इमारत स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती मागवून विभागात असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची देखील माहिती संकलित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कामचुकार व निर्देशांचे अनुपालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही डॉ. जावळे यांनी दिले आहेत. महानगरपालिकेत आता प्रशासक राज्य सुरू झाले असल्याने प्रशासक म्हणून महापालिका प्रशासनाचे सर्व अधिकार आयुक्त डॉ. जावळे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त डॉ.जावळे यांची जबाबदारी वाढली आहे प्रशासक पदाच्या कालावधीमध्ये शहराचे अनेक प्रश्न ते कसे हाताळतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे