अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. या प्रकरणी पीडितांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांसह नातेवाईक मुलींचा शोध घेत आहेत.
42 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी, त्यांची अल्पवयीन मुलगी (वय 17) या 1 डिसेंबर रोजी तारकपूर परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगी फिर्यादीला म्हणाली मी बाटलीमधून पाणी पिवून येते. दरम्यान, बराच वेळ झाला तरी मुलगी परत न आल्याने फिर्यादीने तिचा शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. फिर्यादी यांनी सोमवारी (9 डिसेंबर) तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी करत आहेत.
मुलीला पळवून नेल्याची दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी राहत असलेल्या वस्तीवरील राहत्या घरासमोरून त्यांच्या अल्पवयीन मुलीला (वय 14) अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. सदरचा प्रकार फिर्यादी व नातेवाईकांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.