जामखेड । नगर सहयाद्री:-
ज्या अजितदादांनी रोहित पवारांना मोठं केलं त्यांच्याप्रति त्याची द्वेषाची भावना आहे. माझ्यासारख्या जेष्ठ माणसालाही तो चंगुमंगु म्हणतो, मग तुम्ही आम्ही कोण ? यंदा कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरूध्द लफंगा असा सामना होणार आहे. रोहित पवार हा लफंगा असून हा लफंगा तिकडून येऊन आपल्याला मतं मागत फिरतोय, या लंफग्याला बारामतीला पाठवण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे असे अवाहन भाजपचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी केले.
आमदार प्रा राम शिंदे यांनी जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमांतून जामखेड तालुका पिंजून काढला. त्याच्या या पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळा गावात जनसंवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता झाली. तत्पूर्वी जवळा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. समतानगर ते जवळा बसस्थानक अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर जवळा बसस्थानकासमोर सांगता सभा संपन्न झाली. यावेळी जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात बोलत होते. यावेळी आमदार प्रा राम शिंदे, यांच्यासह महायुतीचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
रोहित पवारांना जामखेड तालुक्यात कुकडीचे पाणी आणता आले नाही. त्यांनी मागच्या पाच वर्षांत कुकडीच्या पाण्याचं व उद्योग व्यवसायाचं नाव घेतलं नाही, एकाही तरूणाला नोकरी लावली नाही. नुसती स्टंटबाजी, भूलवाभूलवी केली. रोहित पवार एमआयडीसीचे दोन नकाशे घेऊन मतदारसंघात फिरायचे, पण त्यांना एमआयडीसी मंजुर करता आली नाही, परंतू भूमिपुत्र आमदार प्रा. राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुर करूनच आणली. आपला तो आपलाच असतो हे त्यांनी दाखवून दिले. रोहित पवारांनी गेल्या पाच वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल भाजपचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी केला.
पुढे बोलताना प्रा मधुकर राळेभात म्हणाले की, कर्जत एमआयडीसीवरून रोहित पवारांनी जनतेची फसवणूक केली. काही वेळा ते म्हणायचे एमआयडीसीच्या फाईलवर सही राहिलीय, नंतर त्यांनी सुरु केलं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढच्या वेळेस माझीच सही त्या फाईलवर असेल, म्हणजे हा पठ्ठ्या आता उद्योगमंत्री व्हायला निघालाय, खर्ड्याच्या कार्यक्रमाच्या वेळी अनेक ठिकाणी बॅनर लागले होते, भावी उद्योगमंत्री, शिक्षणमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, अरे पठ्ठ्या आधी निवडून तर ये, मग बघु काय व्हायचं ते, आधी डिपॉझिट तर वाचवून दाखव, असे म्हणत राळेभात यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला.
गेल्या पाच दिवसांपासून मी जनसंवाद पदयात्रेनिमित्त जामखेड तालुक्यातील ८५ गावांत गेलो. रोहित पवारांपेक्षा राम शिंदेंचा निधी प्रत्येक गावात जास्त होता.अनेक गावांत रोहित पवारांचा निधीच पोहचला नसल्याचे निदर्शनास आले. आमदार शिंदे यांनी पाणलोट, रस्ते विकास, सह आदी प्रचंड कामे केली. रोहित पवारांचा विकास म्हणजे चॉकलेट, पॅड, सीएसआरमधून सायकली वाटणं, मोकळ्या कंपासी देणं हाच होय, याचीच जाहिरातबाजी करून ते खूप काही केल्याचा दावा करतात, जनतेची दिशाभूल करतात,अशी जोरदार टीका यावेळी राळेभात यांनी केली.
कुकडीचं पाणी मीच आणणार : राम शिंदे
आमदार राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना जनतेतून सतत कुकडीच्या पाण्यावर बोला असा आवाज यायचा, त्यावर बोलताना ते म्हणाले कुकडीचे शेतीसाठी पाणी जामखेड तालुक्यात आणू म्हणणार्यांनी मागच्या पाच वर्षात कुकडीचे नाव सुद्धा काढले नाही.फक्त राम शिंदेच कुकडीचे पाणी जामखेडला आणून दाखवीन, असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.