श्रीगोंदा । नगर सहयाद्री :-
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील एका गरिब कुटुंबातील व्यापाऱ्याची तब्बल ५० लाख रुपयांची भोसरीतील गावगुंडांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दामदुप्पट पैसे मिळतील या आमिषाला बळी पडलेल्या व्यापाऱ्यावर आता आत्महत्येची वेळ येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काष्टी येथील व्यापाऱ्याने गाडी व छोटा व्यवसाय करून दीर्घकाळ मेहनतीने पैसे साठवले होते. काही दलालामार्फत त्याला कमी दिवसात दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
सुरुवातीला व्यापाऱ्याने २ लाख रुपये गुंतवले आणि अल्पावधीतच ४ लाख मिळाल्याने त्याचा विश्वास बसला. यानंतर व्यापाऱ्याने आपल्या बचतीतील २५ लाख आणि मित्राकडून घेतलेले २५ लाख असे ५० लाख रुपये दलालाच्या माध्यमातून गुजरात येथे जमा केले. त्याला पुण्यात दुप्पट रक्कम परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र काही दिवसांनी व्यवहारात टाळाटाळ सुरू झाली आणि पुरावा कुठे आहेअशा उलट प्रश्नांनी व्यापाऱ्याची अडचण वाढली.
गावातील लोकप्रतिनिधी व काही प्रभावी व्यक्तींसह व्यापाऱ्याने भोसरी गाठली असता, स्थानिक गुंडांनी दबावाखाली ५० लाखांचा चेक दिला. मात्र खात्यात रक्कम नसल्याने तीन महिन्यांनी तो चेक निष्फळ ठरला. दरम्यान, काही राजकीय नेत्यांनी पैसे मिळवून देतो असे सांगूनही नंतर हात झटकले. या प्रकरणात मोठी आर्थिक तडजोड झाली असून, कोणता नेता फितूर झाला याबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे. लवकरच पीडित व्यापारी पोलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे.