अहमदनगर । नगर सहयाद्री:-
देशामध्ये सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले. नव्या कायद्यानुसार अहमदनगरमध्ये रस्त्यात अडवून लुटीचा पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार हा गुन्हा अजामीन पात्र आहे. त्यामुळे गुन्हेगारांना चाप बसण्यास मदत होणार आहे.
गणेश मोहन शिंदे व त्यांचा मित्र कामरगाव शिवारातून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नव्या कायद्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
देशात सोमवारपासून ३ नवीन फौजदारी कायदे लागू झाले. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) ३(५), आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.