पत्रकार संघाच्या पुढाकाराने ठेवीदार-पतसंस्था चालकांची बैठक | पत्रकारांनी आयोजित केला राज्यातील पहिला प्रयोग
पारनेर | नगर सह्याद्री
सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदार, सभासद आणि संचालक मंडळ यांच्यात काही विघ्नसंतोषी मंडळी आणि मोजक्या संस्थांमधील चुकीच्या कारभारामुळे अविश्वासाचे निर्माण झालेले वातावरण सहकार चळवळीस घातक असल्याचे मत तालुक्यातील पतसंस्था चालक आणि ठेवीदार यांच्या संयुक्त बैठकीत व्यक्त करण्यात आले. पतसंस्थांमधील चुकीच्या कारभारावर नेमके बोट ठेवत त्या विरोधात आवाज उठविणार्या पत्रकारांनीच ही बैठक आयोजित केली होती. पतसंस्था चालक आणि ठेवीदार यांच्या हिताचा व्यापक विचार करत पत्रकारांनी पुढाकार घेऊन अशाप्रकारे बैठक आयोजित करण्याचा हा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचे प्रतिपादन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा अहमदनगर पत्रकार संघाचे सचिव व दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनी केले.
अहमदनगर प्रेस लब व पारनेर तालुका पत्रकार संघातर्फे पतसंस्था पदाधिकारी, ठेवीदार, सभासद व कर्जदार यांचा संयुक्तरित्या पतसंस्था संवाद मेळावा गुरुवारी पारनेर येथील आनंद मंगल कार्यालयात घेण्यात आला. सध्या पारनेर तालुयातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवीदार व सभासदांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वातावरणामुळे सहकार धोयात आला असून गोरगरिबांच्या ठेवीवर उभारलेल्या सहकारी संस्था मोडकळीस येण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही अफवांमुळे विविध पतसंस्थांचे ठेवीदार हवालदिल झाल्याने या ठेवीदार पतसंस्थांचे पदाधिकारी व सभासद यांना एकत्रतीपणे येऊन ठेवींबाबतीत वातावरण निवळण्यासाठी या संवाद मेळाव्याचे आयोजन केल्याचे शिर्के यांनी सांगितले. तसेच अविश्वासाचे वातावरण निवळण्यासाठी सर्व पतसंस्थांनी एकत्र येऊन पतसंस्थांचा महासंघ तयार करण्याचे आवाहन अहमदनगर प्रेस लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी केले आहे.
पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांनी बैठक आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट करताना ठेवीदार आणि संस्था चालक यांनी विश्वासर्हतेला तडा जाणार नाही, याची काळजी घेत सभासद व ठेवीदार यांचे हित जपावे अशी भूमिका मांडली. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर, सहकार विभागाचे अधिकारी टी. एस. भोसले व आर. पी. वाघमोडे तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे, मार्तंड बुचडे, संघाचे उपाध्यक्ष भास्कर कवाद, विनोद गोळे, सेनापती बापट पतसंस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, सुशिला ठुबे, बा. ठ. झावरे, बाजीराव पानमंद, भगवान गायकवाड, बाबाजी वाघमारे यांच्यासह पारनेर तालुयातील पतसंस्था पदाधिकारी, ठेवीदार, सभासद व कर्जदार यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर यांनी केले. आभार संजय भगत यांनी मानले.
अफवा पसरविणार्यांवर विश्वास न ठेवता ठेवीदारांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी: शिर्के
पतसंस्थांमधील विश्वस्त आणि ठेवीदार यांच्यात अतुट नाते आहे. विश्वस्तांकडे पाहूनच ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या आहेत. काही मोजक्या लोकांच्या चुकीच्या कारभाराशी अन्य पतसंस्थांना जोडणे चुकीचे ठरणारे आहे. कोणत्याही बँक अथवा पतसंस्थेत एकाचवेळी ठेवीदार गेले तर कोणालाच ठेवी मिळू शकणार नाहीत, हे वास्तव समजून घेण्याची गरज आहे. ठेवीदारांना त्यांची ठेव मुदत संपल्यानंतर मिळालीच पाहिजे. काही विघ्नसंतोषी मंडळी स्थानिक राजकारणात अतृप्त राहिल्याने पतसंस्थांचा मुद्दा हाताशी धरून ठेवीदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण करत आहेत. खरे तर त्या मंडळींचे संस्थेच्या उभारणीत आणि वाटचालीतील योगदान शुन्य असते आणि हीच मंडळी त्या संस्थेत गावातील राजकारणाचा बदला घेण्यासाठी अफवांचे पिक पसरवतात. अफवा पसरविणार्या मंडळींवर विश्वास न ठेवता ठेवीदारांनी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा अहमदनगर पत्रकार संघाचे सचिव व दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनी केले.