Maharashtra Crime News: जालना जिल्ह्यातील वंजार उम्रद गावात एका २१ वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. अर्पिता वाघ असे मृत तरुणीचे नाव असून तिचा मृत्यू गळफासामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मृत्यूनंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता नातेवाईकांनी पहाटेच अंत्यविधी उरकल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
ही घटना ११ ऑगस्टच्या रात्री घडली असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ ऑगस्ट रोजी पहाटेच अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने आणि प्रकरण संशयास्पद असल्याने जालना तालुका पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणे बाकी आहे.
अंत्यविधी झालेल्या स्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांनी राख व अन्य अवशेषांचे नमुने जप्त केले आहेत. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ही घाईगडबड केली गेल्याचा पोलिसांना संशय आहे.या प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, तपास अधिक सुरू आहे. अर्पिता वाघच्या मृत्यूमागील सत्य काय आहे, हे शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून उघड होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.