अहमदनगर। नगर सहयाद्री
येथील जिल्हा रूग्णालयाच्या लसीकरण विभागासमोरील ओट्यावर एका महिलेवर अत्याचार करून तिला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. ४) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. उपनगरात राहणार्या पीडित महिलेने याप्रकरणी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये रूग्णवाहिकेचा चालक, जिल्हा रूग्णालयातील वॉचमन यांचा देखील समावेश आहे. शानु शब्बीर शेख (रा. बारा इमाम कोठला, नगर), बासीद मुक्तार खान (रा. खान मळा, लिंक रस्ता, केडगाव), रूग्णवाहिकेचा चालक आशिष जाधव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), जिल्हा रूग्णालयातील वॉचमन पवन गाडे (रा. भारस्कर कॉलनी, लाल टाकी, नगर), शकील मोमीन शेख (रा. रेणुका मंदिरामागे, अंबिकानगर, केडगाव), शबनम गफुर मोमीन (रा. रेणुका मंदिरामागे, अंबिकानगर, केडगाव), वैशाली आशिष जाधव (रा. पाइपलाइन रस्ता, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी महिला सोमवारी पहाटे जिल्हा शासकीय रूग्णालयातील लसीकरण विभागासमोरील ओट्यावर असताना शानु शेख, बासीद खान, रूग्णवाहिका चालक आशिष जाधव, वॉचमन पवन गाडे व शकील शेख यांनी तिच्या इच्छेविरूध्द जबरदस्तीने अत्याचार केले. फिर्यादी महिलेने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करून आरडाओरडा केला असता शबनम मोमीन व वैशाली जाधव यांनी त्यांना मारहाण केली व जाताना फिर्यादीच्या कपड्यांची बॅग सोबत घेऊन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक पी. ए. श्रीवास्तव करीत आहेत.