नवी दिल्ली / नगर सह्याद्री : आपल्या देशात ‘वंदे भारत’ आणि ‘अमृत भारत’ सारख्या वेगवान रेल्वे आता सुरु झालेल्या आहेत. यांचा वेग व सुविधांमुळे जनतेला विविध सुविधा मिळणार आहेत.
पण आता चीन कैकपटीने अधिक वेगवान सुपरसॉनिक ट्रेन तयार करत आहे. ही ट्रेन ताशी 1000 किलोमीटर वेगाने धावणार आहे. या ट्रेनला ‘अल्ट्रा हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन’ (मॅगलेव्ह) ट्रेन असे म्हटले आहे.
ही रेल्वे एका लांब पाइपलाइनच्या आत चालवली जाणार असल्याचे म्हटले आहे. एका रिपोर्ट्सनुसार चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेडने या मॅगलेव्ह ट्रेनची चाचणी शांसी येथील चाचणी क्षेत्रात केली.
येथे दोन किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमध्ये व्हॅक्यूम तयार करून ट्रेन चालवण्यात आली. भविष्यात हांगझोऊ आणि शांघाय, या दोन शहरादरम्यान ही ट्रेन सुरू करण्याची योजना चीन आखत आहे. सध्या 623 किलोमीटर प्रतितास या वेगाने चाचणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, व्हॅक्यूम निर्माण न करता ही गती प्राप्त झाली आहे. व्हॅक्यूम तयार केल्यानंतर ट्रेनचा वेग ताशी 1000 किलोमीटर होईल असे सांगितले जात आहे.