पुणे | नगर सह्याद्री
दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ५ हजार ८६ केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं असून परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
आज (दि. २९) माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार आहे.
उद्या दहावीचा पहिला पेपर आहे परीक्षा अत्यंत तणावमुक्त व वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणार्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
दहावीच्या परीक्षेला राज्यातील २३ हजार २७२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ५ हजार ८६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. ८ हजार ८१० दिव्यांग विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. सध्या बारावीचेही पेपर सुरु आहेत. दोन्ही परीक्षांसाठी तब्बल १ लाख ८० हजारांवर मनुष्यबळ कार्यरत राहणार असल्याचे राज्य मंडळातील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.