अहिल्यानगर / नगर सह्याद्री
नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पत्रके फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच या घटनेेतील मुख्य सुत्रधारास अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्यावतीने शनिवारी भिंगार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी तसेच भिंगार शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भिंगार कॅम्प पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भिंगार येथील व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे भिंगार शहरातील नेहमी गर्दीने गजबजलेले रस्ते आज ओस पडले होते.
नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील उड्डाणपुलावरून काही अज्ञात व्यक्तींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पत्रके फेकल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आंबेडकरी समाजाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून 24 तासाच्या आत एका आरोपीला अटक केली. आंबेडकरी समाजाच्यावतीने मुख्य सुत्रधारास अटक करण्याची मागणी करण्यात आली असून सदर घटनेच्या निषेधार्थ आज भिंगार शहरात बंद पाळण्यात आला आहे.