विखेंनी डमी नीलेश लंकेचा अर्ज भरल्याचा झाला होता आरोप | नगरमध्ये होणार काँटे की टक्कर
विखे समर्थकांचा अजब सवाल? आता नीलेश लंके यांना लपता येणार नाही अन् विखे यांना सिद्ध करावे लागणार! ‘वंचित’चे खेडकर मैदानात कायम!
शिवाजी शिर्के । नगर सह्याद्री
उमेदवारी माघारीची मुदत संपताच सोशल मिडियावर माघार घेतलेल्या प्रमुख उमेदवारांपैकी तिघांची नावे आली. त्यात एमआयएम आणि अपक्ष नीलेश लंके या दोघांशिवाय तिसरे नाव होते वंचित बहुजन आघाडीच्या दिलीप खेडकर यांचे! (वास्तविक, वंचितच्या खेडकर यांची उमेदवारी कायम आहे.) या तीघांनी माघार घेतल्याचे आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांनी विखे यांची पन्नास वर्षांच्या यंत्रणेला सुरुंग लावल्याच्या, पन्नास वर्षांच्या यंत्रणेचा बागुलबुवा फुटल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. विखेंची यंत्रणा त्रिफळाचित असेही म्हटले गेले. याचाच अर्थ या दोघांच्या माघारीत नीलेश लंके अथवा त्यांच्या यंत्रणेने ‘भूमिका’ बजावली. या दोघांची उमेदवारी विखेंनी दाखल केली आणि रडीचा डाव खेळला असा आरोप झाला असताना नीलेश लंके समर्थकांनी या दोघांचे अर्ज मागे घेण्याचे कारण काय? या दोघांच्या उमेदवारी माघारीचे क्रेडीट लंके व त्यांचे समर्थक घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वंचितचे उमेदवार खेडकर यांनी त्यांच्या माघारीचे वृत्त प्रसारीत करणार्या लंके समर्थकांवर आगपाखड करत आपला संताप व्यक्त केला हे विशेष!
नगर लोकसभेच्या उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय हालचाली झाल्या. पन्नास वर्षांच्या विखेंच्या यंत्रणेला सुरुंग लावला अशा मथळ्याखाली बातम्या झळकल्या आणि त्या व्हायरलही झाल्या! विखेंच्या इशार्यावर एमआयएम आणि अपक्ष लंके यांनी अर्ज भरल्याची चर्चा झडली आणि आज या सर्वांनी लंके यांच्या इशार्यावर हे अर्ज मागे घेतले असा अर्ज ध्वनीत झाला. शिवसेना बंडखोर गिरीष जाधव यांचा अर्ज अपेक्षेप्रमाणे मागे आला इतकाच! माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले असताना नीलेश लंके यांनी विखे यांच्या पन्नास वर्षांच्या यंत्रणेला सुरुंग लावल्याची पोस्ट बरीच बोलकी ठरली. अपक्ष लंके, एमआयएम या उमेदवारांनी अर्ज दाखल करताच या सर्वांचे अर्ज विखेंच्या इशार्यावर भरल्याची चर्चा झडली आणि आता या सर्वांनी उमेदवारी माघार घेताच लंके यांनी विखेंना सुरुंग लावला म्हणजेच या तीघांचेही ओटीभरण लंके यांनी केले का असा सवाल विखे समर्थक करू लागले आहेत.
नगर लोकसभेच्या निवडणुकीत निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठी नाट्यमय हालचाली सुरू आहेत. सुजय विखे आणि नीलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोघांच्याही यंत्रणा सतर्क झाल्या. दोघांनीही एकमेकांवर थेट हल्ला केला आणि आपणच कसे सक्षम आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न प्रचार सभांमधून केला. या मतदारसंघात एकास एक लढत झाल्यास आपणास फायदा होईल असे गणित नीलेश लंके यांच्याकडून मांडले जात होते. त्यानुसार व्यूहरचना देखील केली जात होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यापाठोपाठ एमआयएम या पक्षाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल झाला. हे दोन्ही उमेदवार विखे यांच्याकडूनच मतांची विभागणी होण्यासाठी दिले गेलेत असा कांगावा लागलीच सुरू झाला. ही चर्चा थांबत नाही तोच नीलेश लंके यांचे नावसाधर्म्य असणार्या नीलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
अपक्ष नीलेश लंके यांचा अर्ज आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अर्जाचा पर्दाफाश केला आणि नीलेश लंके यांचे सुचक आणि अनुमोदक, नोटरी, वकील हे सुजय विखे यांचे कसे समर्थक आहेत हे पुराव्यानिशी समोर आणले. या अपक्ष अर्जामुळे आणि त्यातील सुचक, अनुमोदक यांची पोलखोल होताच विखे यांच्या हेतूबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्या मतांचे विभाजन होण्यासाठी विखे यांनीच हे सारे उमेदवार दिले असल्याची चर्चा आणि बातम्या लागलीच समोर आल्या. त्यात गैर काहीच नव्हते.
मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष नीलेश लंके यांच्यासह एमआयएम आणि वंचित या तीघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची पोस्ट नीलेश लंके यांच्या समर्थकांकडून सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्याच्या जोडीने सोशल मिडियावर पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या समर्थकांकडून, ‘विखे यांच्या पन्नास वर्षांच्या यंत्रणेला सुरुंग’, या मथळ्याखाली सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आणि नीलेश लंके समर्थकांचे स्टेटसही दिसू लागले. विखे यांच्या यंत्रणेला सुरूंग लावण्यात पवार समर्थक उमेदवार नीलेश लंके हे यशस्वी झाले असाच काहीसा या पोस्टचा अर्थ! याचाच अर्थ हा सुरूंग म्हणजेच या दोनही प्रमुख उमेदवारांचे अर्ज मागे घ्यायला लावण्यात नीलेश लंके हे यशस्वी ठरले. विखे यांच्या इशार्यावर या दोघांनी अर्ज भरले असतील तर मग लंके यांच्या इशार्यावर या दोघांनी अर्ज मागे घेतले असाच त्याचा अर्थ ध्वनीत होतो. विखे यांच्याकडून ‘प्रसाद’ घेतला आणि अर्ज दाखल केले असा या दोघांवरही नीलेश लंके समर्थकांनी आरोप केला होता.
आता या दोघांचीही माघार झाली आणि ती देखील लंके समर्थकांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्याच प्रयत्नातूनच! म्हणूनच या दोघांनीही लंके यांचा ‘प्रसाद’ घेतल्याचा आरोप विखे समर्थकांनी सुरू केलाय! बिच्चार्या या दोघांनाच माहिती की त्यांच्या उमेदवारीचे नक्की काय ते? यातून जनतेचे मनोरंजन झाले असले तरी या दोघांच्याही उमेदवारीच्या निमित्ताने विखे आणि लंके या दोघांच्याही भूमिका जनतेसमोर आल्या आहेत हे नक्की! मतांचे विभाजन होण्यासाठी अपक्ष नीलेश लंके आणि एमआयएम हे उमेदवार दिले आणि त्यांनी मते खाल्ली असे आता नीलेश लंके यांना अथवा त्यांच्या समर्थकांना म्हणता येणार नाही. लढाई सरळसरळ होणार आहे. विखे आणि लंके या दोघांनाही आता कोणाच्याच आड लपता येणार नाही. त्यामुळेच या निवडणुकीत खरी रंगत आता सुरू झाली असल्याचे मानले जाते.
एमआयएम उमेदवाराची माघार; मुस्लिम समाज लंके यांच्या सोबत
मुस्लिम मतांच्या विभागणीत भाजपचा फायदा होतो आणि भाजपा उमेदवार निवडून येतो अशी चर्चा होत असते. नगरमधील मुस्लिम समाजातील काही ज्येष्ठांची यावर मोठी खलबते झाली आणि आपल्यावर कोणाचा दोष येऊ नये अशी भूमिका घेतली गेली. त्यातूनच त्यांनी एमआयएमच्या नेत्यांच्या सोबत बैठक करत उमेदवारी नको ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्यातूनच एमआयएमचे उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ही माघार नीलेश लंके यांच्या मध्यस्थीने झाली असल्याचा दावा लंके यांचे समर्थक करत आहेत. याचाच अर्थ आता मुुस्लिम समाजाची मते लंके यांच्या सोबत जातील असा कयास बांधला जात आहे आणि ही लंके यांच्या जमेची बाजू ठरणार आहे. एमआयएमच्या उमेदवाराने माघार घेतली म्हणजेच त्या उमेदवाराचा अदृष्य पाठींबा नीलेश लंके यांनाच मानला जात आहे.
वंचितचा अर्ज, उमेदवार राहिला असताना त्याबाबत जाणिवपूर्वक गैरसमज पसरवला!
नगरमधून वंचित बहुजन आघाडीने दिलीप खेडकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांची उमेदवारी कायम राहिली. मात्र, असे असताना उमेदवारी माघारी घेण्याची मुदत संपत असताना त्यांनी देखील उमेदवारी माघारी घेतल्याची पोस्ट लंके समर्थकांकडून व्हायरल करण्यात आली. वास्तविक त्यांची उमेदवारी कायम होती. अपक्ष नीलेश लंके आणि एमआयएम उमेदवार यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार याची जाणिव लंके समर्थकांना होती. त्यामुळेच या दोघांची उमेदवारी मागे घेतल्याचे क्रेडीट लंके समर्थकांनी त्यांच्याकडे घेतले. मात्र, हे करताना त्यांनी वंचितच्या खेडकर यांच्या माघारीची पोस्ट देखील व्हायरल केली. त्यामुळे वंचित समर्थक कार्यकर्ते संतप्त झाले. जाणिवपूर्वक आमच्याबद्दल गैरसमज पसरवला जात असल्याबद्दल वंचितकडून याचा निषेध करण्यात आला.