अहमदनगर। नगर सहयाद्री
घटस्फोट घेतलेल्या महिलेला तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्या मुलांच्या नावावर एफडी करण्यासाठी घेतलेले पाच लाख रूपयांची परस्पर विल्हेवाट लावली. या प्रकरणी नगर शहरातील पीडित महिलेने मंगळवारी (दि. १६) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
करण विजय शेलार (रा. मोहिनीनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फिर्यादीचा १८ मे २०२३ रोजी पतीसोबत घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. फिर्यादी यांची २०१८ मध्ये करण शेलारसोबत ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध झाल्याने करण याने फिर्यादीकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. फिर्यादी यांनी करण याच्यावर विश्वास ठेऊन लग्नाची तयारी दाखवली.
दरम्यान करण याने फिर्यादीकडे पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर लग्न करू, असे म्हटल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर फिर्यादीला पतीकडून रोख स्वरूपात पाच लाख रूपये मिळाले होते. ते करण याने फिर्यादीच्या मुलांच्या नावावर एफडी करण्यासाठी मागितले. फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेऊन पाच लाख रूपये दिले. त्याने पाच लाखांची परस्पर विल्हेवाट लावून दुसर्या मुलीसोबत लग्न करून फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.