मुंबई | नगर सहयाद्री:-
कल्याणच्या खडकपाडा परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकाकडून ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लिफ्टमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून, परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
अमोल जगताप असं या सुरक्षारक्षकाचं नाव असून, त्याने लिफ्टमध्ये एकटी असलेल्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचं फुटेज समोर आलं आहे. ही बाब समजताच इमारतीतील रहिवाशांनी संबंधित वॉचमनला पकडून चोप दिला आणि त्यानंतर खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर समाजात सुरक्षेच्या नावावर उभ्या असलेल्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. दोन दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील हायप्रोफाईल सोसायटीत वॉचमनने दोन मुलांना बांधून मारहाण केल्याची घटना ताजी असताना, कल्याणमधील ही दुसरी घटना चिंता वाढवणारी आहे.
रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नेमले गेलेले सुरक्षारक्षकच जर अशा प्रकारचं वर्तन करत असतील, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करताना सोसायट्यांनी आणि सुरक्षा एजन्सींनी अधिक काटेकोर तपासणी करणं गरजेचं असल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे.