जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड मतदारसंघातील 17 बूथसाठी आठ लाख 2400 रुपये शुल्क भरत भाजपचे माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी शेवटच्या फेरीमध्ये बाजी मारली. रोहित पवार यांनी महायुतीचे उमेदवार आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव केला.
यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. भेटीत ते रोहित पवार यांना म्हणाले की, माजी सभा झाली असती तर काय झाले असते. या विधानाने राज्यांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर राम शिंदे यांनी अजित पवार व रोहित पवार यांनी मला पाडण्याचा कट केला होता असा आरोप देखील केला होता.
सध्या राज्यामध्ये ईव्हीएम मशीन बद्दल महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवाराकडून आणि रोहित पवार यांनी जोरदार आरोप केले आहेत. हे आरोप सुरू असतानाच आता आमदार राम शिंदे यांनी देखील कर्ज जामखेड मतदार संघामध्ये ईव्हीएम वर आक्षेप घेत 17 बुथवर ईव्हीएम चे मतमोजणीची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ईव्हीएम वर अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता याकडे संपूर्ण राज्याची पुन्हा लक्ष लागले आहे.