अहिल्यानगर । नगर सहयाद्री
साईभक्तांच्या वाहनावर हल्ला करून लूटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली असून ९ लाख ६४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रविवार दि. १६ रोजी मोहित महेश पाटील ( रा. दिंडोली, जि. सुरत, गुजरात ) यांच्या चार चाकी वाहनावर हल्ला करून मारहाण करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटले होते. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला सूचना दिल्या. दरम्यान,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाडी फाटयाजवळ सापळा रचत विजय गणपत जाधव ( रा.गोंधवणी रोड, श्रीरामपूर), सिध्दार्थ भाऊसाहेब कदम, राहुल संजय शिंगाडे, सागर दिनकर भालेराव, समीर रामदास माळी, दोन विधीसंघर्षित बालक ( सर्व रा.पोहेगाव, ता.कोपरगाव ) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली.
अधिक विश्वासात घेत विचारपूस केली असता त्यांनी धारदार हत्याराने चार चाकी गाडीच्या काचा फोडून सदरचा गुन्हा केला असल्याची दिली. तसेच कोपरगाव, संगमनेर, घोटी, वैजापूर येथे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ९ लाख रुपये किंमतीची एक चार चाकी कार, ४५ हजार रुपये किंमतीचे ३ मोबाईल, ११ हजार रुपये किंमतीच्या दोन एअर गण, ३ हजार रुपये किंमतीची लोखंडी कत्ती, १ हजार रुपये किंमतीची छर्रे असलेली डबी, ४ हजार रुपये किंमतीच्या पिवळया धातुच्या अंगठयाअसा एकुण ९ लाख ६४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासकामी आरोपींना कोपरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, रमीजराजा आत्तार, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर यांनी बजावली आहे.