मुंबई | नगर सहयाद्री
राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तब्बल १० लाख महिलांचे अर्ज सरकारने बाद केले असून, त्यांना योजनेचा दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा लाभ आता थांबवण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून सुरू असलेल्या अर्ज पडताळणी प्रक्रियेच्या दरम्यान हे स्पष्ट झाले की अनेक महिलांचे अर्ज योजनेच्या अर्हतापत्रकात बसत नाहीत. त्यात प्रामुख्याने खालील कारणांमुळे अर्ज बाद झाले आहेत.
अर्जदाराचे कुटुंबीय उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असणे, महिलांनी इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेतलेला असणे, वयाची अट पूर्ण न होणे (२१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान नसणे), बनावट किंवा अपूर्ण कागदपत्रे जमा करणे, या प्रक्रियेसाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात आली असून, त्याच्या आधारे अर्ज छाननीतून बाद झाले आहेत. या निर्णयामुळे सुमारे १० लाख महिलांना दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा निधी बंद करण्यात आला आहे.
यामुळे राज्यभरातून महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे आणि काही ठिकाणी तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. सरकारकडून अजून यादी अधिकृतरीत्या प्रकाशित झालेली नाही, मात्र लवकरच लाभार्थ्यांची यादी जिल्हास्तरावर प्रसिद्ध होणार आहे. महिलांनी आपल्या अर्जाची स्थिती महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा स्थानिक अंगणवाडी/महिला केंद्रात जाऊन तपासावी.