चौघे जखमी | सोने, ऐवज लुटला | जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार
सुनील चोभे । नगर सहयाद्री :-
विळद ते के के रेंज कडे जाणाऱ्या रस्त्यालगत नारूंडी पाझर तलावाजवळ राहत असलेल्या मेंढपाळांवर 10 ते 12 दरोडेखोरांनी हल्ला करत दरोडा टाकल्याची घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून महिलांचे सोने तसेच ऐवज लुटून नेला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोपट बन्सी होडभर ( धंदा. मेंढीपालन रा. पिंप्री घुमट, विळद ता. जि. अहिल्यानगर ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार10 ते 12 दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री दीडच्या सुमारास आलेल्या 10 ते 12 अज्ञात दरोडेखोरांनी विळद परिसरातील नरोडी पाझर तलावाजवळ राहत असलेल्या मेंढपाळांवर दरोडा टाकला. यावेळी मेंढपाळ व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली. दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. महिलांच्या गळ्यातील, कानातील सोने ओरबाडून नेले. दरोडेखोरांनी अंदाजे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. यात महिला जखमी झाल्या आहेत. तसेच काही पुरुषही जखमी झाले आहेत.
रात्रीच्या सुरामास आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली परंतु नागरिकांना पाहून दरोडेखोरांनी पोबारा केला. याची माहिती नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह रात्री घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला.
यात जखमी झालेल्या महिला व पुरुषांना अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णातयाल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात लक्ष्मण विठ्ठल सूळ, प्रकाश लक्ष्मण सूळ, शीतल पोपट होडगर आणि सुमन लक्ष्मण सूळ असे चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.