श्रीगोंदा / नगर सह्याद्री –
राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली आहे. माजी सैनिक नवनाथ खामकर यांच्या संकल्प एस. मार्ट किराणा मॉलला दि. २१ सप्टेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत सर्वस्व भस्मसात झाले होते. काही तासांत उध्वस्त झालेले हे स्वप्न फक्त १७ दिवसांत पुन्हा वास्तवात उतरले — आणि तेही लोकसहभागातून!
आगीत माजी सैनिक नवनाथ खामकर व मयुरेश धारकर यांचा दोन हजार चौरस फुटांचा मॉल पूर्णतः जळून खाक झाला. जीवनभराची कमाई आणि मेहनत एका क्षणात संपल्याने खामकर निराश झाले होते. मात्र “मेजर, तुम्ही काळजी करू नका — आम्ही तुमच्यासोबत आहोत!” असा हृदयस्पर्शी शब्द श्रीगोंदेकरांनी दिला. त्या भावनेने प्रेरित होऊन जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मदतीचे हात पुढे आले आणि तब्बल २७ लाख रुपयांचा लोकसहभाग उभा राहिला.
बांधकाम व्यावसायिक नवनाथ दरेकर व नानासाहेब कोंथिबीरे यांनी निस्वार्थ भावनेने बांधकामाचे काम हाती घेतले. तर माजी सैनिक संघटना आणि हरिओम योगा ग्रुपने दररोज श्रमदान करून खामकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावला. परिणामी, फक्त १७ दिवसांत मॉल पुन्हा उभा राहिला — आणि त्याचे नाव देण्यात आले “मित्रप्रेम मॉल”.
या मॉलचे लोकार्पण माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार निलेश लंके, नगराध्यक्ष अनुराधा नागवडे, तसेच शुभांगी पोटे, सतिश बोरा, पोपटराव खेतमाळीस, ज्योती खेडकर, अभिषेक दंडनाईक, राजू गोरे, राहुल कोठारी, संदीप सांगळे, संजय लाकूडझोडे, शहाजी खेतमाळीस, अंकुश खोटे आणि रमाकांत चिकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आभार प्रदर्शन करताना नवनाथ खामकर यांनी भावनिक शब्दांत म्हटले, “आगीने माझे सर्व काही घेतले, पण श्रीगोंदेकरांनी मला पुन्हा जीवन दिले. हा मॉल म्हणजे फक्त माझे स्वप्न नाही — तो श्रीगोंद्याच्या एकतेचा प्रतीक आहे.”