नई दिल्ली / नगर सह्याद्री :
सातत्याने वाढणारी महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत असते. नुकतेच शासनाने डाळ, पीठ आदींच्या भरमसाठ किमती वाढल्यानंतर केंद्राने स्वस्त दरात ‘भारत आटा’, ‘भारत डाळ’ आदी स्वस्त दरात उपलब्ध करून दिले. आता केंद्र सरकार ‘भारत तांदूळ’ विकणार आहे. लोकांना एक किलो तांदूळ अवघ्या 25 रुपयांत मिळणार आहे.
25 रुपयात तांदूळ
एका वृत्तानुसार, भारत सरकार नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडारच्या माध्यमातून स्वस्त तांदूळ विकणार आहे. लोक 25 रुपये किलोने ‘भारत तांदूळ’ खरेदी करू शकतील. काही काळापासून तांदळाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यंदा तांदळाच्या दरात १४.१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सामान्य नॉन-ब्रँडेड तांदळाची किंमत सरासरी ४३.३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अशा स्थितीत तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने भारत ब्रँड अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला.
भारत पीठ, भारत डाळीची आधीपासूनच विक्री
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने याआधी भारत ब्रँड अंतर्गत स्वस्तात पीठ, डाळी विक्री करत आहे. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने भारत आटा लाँच केला होता, ज्यामध्ये लोकांना २७.५० रुपये किलो दराने स्वस्त पीठ मिळू शकते. ६० रुपये किलो दराने भारत डाळ विकत आहे. यापूर्वी कांदा आणि टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना सरकारने जनतेला बाजारापेक्षा कमी दरात कांदा आणि टोमॅटो उपलब्ध करून दिला होता. आता तांदूळ २५ रुपये किलोप्रमाणे विकले जाणार आहे.