अहिल्यानगर | नगर सह्याद्री
घरात भाड्याने राहणाऱ्या आणि नात्यातील असलेल्या चौघांनी मिळून घरातील तब्बल 1 लाख 92 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना केडगाव येथील शास्त्रीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी रेणुका सुनील गडाख (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दिलीप सर्जेराव आमटे, पूजा दिलीप आमटे, अभिषेक संदीप आमटे आणि सागर चांगदेव शिंदे यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेणुका गडाख यांच्या घरी आरोपी दिलीप आमटे हे आपल्या कुटुंबीयांसह गेल्या सहा महिन्यांपासून भाड्याने राहत होते. ते नात्यातील असल्याने त्यांचा घरात सहज वावर होता. दि. 5 मे 2025 रोजी एका कार्यक्रमानंतर सौ. गडाख यांनी आपले मंगळसूत्र, अंगठी आणि कर्णफुले असे एकूण 64 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत 1 लाख 92 हजार रुपये) कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. लॉकरची किल्ली त्या कपाटातच साडीखाली ठेवत असत, याची माहिती आरोपींना होती. दि. 18 जुलै 2025 रोजी दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी दागिने काढायला गेल्या असता लॉकर रिकामा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच सुमारास भाड्याने राहणारे दिलीप आमटे व इतर संशयित आरोपी कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. फिर्यादीने त्यांना फोन केले असता त्यांनी फोन उचलले नाहीत. यावरून आपला विश्वासघात करून त्यांनीच दागिने चोरल्याची खात्री झाल्याने सौ. गडाख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
शहरात विनापरवाना फ्लेक्सबाजी भोवली
शहरात विनापरवाना आणि अनधिकृतपणे फ्लेक्स लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत दोन ठिकाणी लावलेले बेकायदेशीर फ्लेक्स जप्त केले असून, संबंधित फ्लेक्सधारकांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती क्र. 01 चे प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सावेडीतील नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौकात, कोहिनूर मॉलसमोर रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबावर ’मंगलमूत वास्तू प्रा. लि.’ या कंपनीचा सुमारे ु53 फुटांचा एक मोठा फ्लेक्स बोर्ड बेकायदेशीरपणे लावलेला आढळून आला. त्याचबरोबर, नगर-मनमाड रोडवरच, नागापूर पुलाच्या उत्तर बाजूला असलेल्या जांगीड फर्निचरसमोर रस्त्याच्या मध्यभागी विजेच्या खांबाला आकाश कातोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा ु25 फुटांचा फ्लेक्स बोर्ड लावण्यात आला होता. हे दोन्ही फ्लेक्स बोर्ड महापालिकेच्या पथकाने तातडीने काढून जप्त केले आहेत.
शहरात विनापरवाना फ्लेक्स आणि बॅनर्स लावण्यास उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेनुसार बंदी आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत महापालिका आयुक्त यांनी अनधिकृत बोर्ड लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार, श्री. बाळासाहेब पवार यांनी ’मंगलमूत वास्तू प्रा. लि.’ आणि आकाश कातोरे यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स लावणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध अधिनियम 1995, कलम 3 अन्वये फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे शहरात विनाकारण फ्लेक्सबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.