बांधकाम क्षेत्रात अल्पावधीत ठसा | राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कार
पारनेर|नगर सहयाद्री
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील महावीर उद्योग समूहाचे उद्योजक नगर येथील बांधकाम व्यावसायिक हर्षल उर्फ राजेश संतोष भंडारी यांना बांधकाम क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन अंतर्गत भंडारी यांना बेस्ट यंग बिजनेस टायकून इन रिअल इस्टेट अॅण्ड कन्स्ट्रक्शन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२३ वर्षाचा हा पुरस्कार राजेश भंडारी यांना मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या छोट्याशा गावातून आलेले राजेश भंडारी यांनी वडिलांचा कापड व्यवसाय सांभाळला. त्यानंतर २००९ साली वर्षानुवर्षे चालत आलेला कापड व किरणा व्यवसाय आगीत जळून भस्मसात झाला. दोन वर्षांनी पुन्हा त्यांनी या व्यवसायाची उभारणी केली व त्याला व्यवसायिक जमीन खरेदी विक्री प्लॉटिंगच्या व्यवसायाची जोड दिली.
बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय इतक्या जोमाने वाढीस लागला की, अवघ्या दोन-तीन वर्षात अहमदनगर जिल्हात महावीर होम्स नावारूपाला आला. त्यांनी मुंबई, पुणे यांसारख्या मोठ-मोठ्या शहरांत ज्याप्रमाणे उत्तम दर्जाचे भव्यदिव्य प्रकल्प उभारले जातात अगदी त्याचप्रमाणे दर्जेदार प्रकल्प नगर शहरात उभारण्यास प्रारंभ केले. बांधकाम क्षेत्रात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण करुन विविध प्रकल्पाच्या माध्यमातून नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला.
विविध क्षेत्रात व्यवसाय करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून योगदान दिले. कोरोना काळात अनेक गरजूंना अन्नदान, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करुन सातत्याने सामाजिक उपक्रमात ते हातभार लावत आहे. महावीर ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे बांधकाम क्षेत्रात उत्तमपणे कार्य सुरु असून ६०० पेक्षा अधिक बेरोजगारांना त्यांनी रोजगाराची संधी निर्माण करुन दिली आहे. राजेश भंडारी यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी देखील विविध पुरस्काराने सन्मान झाला आहे. बांधकाम क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फिनिक्स पक्षाच्या विचारांशी आम्ही बांधिल..
स्वतःचे साम्राज्य शून्यातून उभं करणे, हे सोपं काम नसतं. यासाठी प्रचंड मेहनत घेऊन स्वत:ला झोकून द्यावे लागते. मोठा त्रास सहन करावा लागतो. असंख्य अडचणींना तोंड देऊन वाटचाल करावी लागते. जो व्यक्ती या सर्व गोष्टींवर मात करुन पुढे जातो. तो आपले साम्राज्य उभं करतो.त्यामुळे आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी न थांबता फिनिक्स पक्षाच्या विचारांशी आम्ही बांधिल