अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून चारही प्रभाग समिती कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एक जूनपासू हा कक्ष कार्यन्वित होणार आहे. दरम्यान, सध्याच्या अवकाळी पावसाने निर्माण झालेल्या स्थितीत सर्व प्रभाग अधिकार्यांना बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका हद्दीत पावसाळ्यात झाड कोसळणे, विद्युत खांब कोसळणे, नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात घुसणे तर, धोकदायक इमारत कोसळणे अशा घटना घडतात. त्यावर मात करण्यासाठी, मोठी आपत्ती निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना व्हाव्यात, या उद्देशाने प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे.
या कक्षामध्ये दिवस रात्री एक कर्मचारी राहणार असून, तक्रार आल्यास तत्काळ त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच, प्रभाग समिती कार्यालयात आरोग्य, विद्युत, उद्यान, बांधकाम, पाणीपुरवठा, अग्निशनम विभागाच्या प्रत्येकी एक कर्मचार्यांची पथक राहणार आहे. मुख्य नियंत्रण कक्ष जुनी महापालिका अग्निशमन कक्ष येथे राहणार असून, अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.