कान्हूर पठार, तिखोल, टाकळी ढोकेश्वर भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये उत्साह
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्याच्या उत्तर भाग, पठार परिसर, सुपा आणि निघोज पट्ट्यात गेल्या आठ दिवसांपासून सलग पाऊस कोसळत आहे. मे महिन्याच्या मध्यातच ऋतुमान बदलला असून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे नांगरणी केलेल्या शेतांमध्ये पाणी साचले असून, खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुधवारीही चांगला पाऊस झाला.
कान्हूर पठार, तिखोल, किन्ही-करंडी, पिंपरी पठार, पिंपळगाव रोठा, काकणेवाडी, भोंद्रे, टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, कर्जुले हर्या, कासारे आणि सावरगाव या भागात बुधवारी संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतीतील खरीप हंगामातील पेरणीपूर्वीच्या कामांना आता गती मिळणार आहे. पावसामुळे साठवणूक केलेल्या कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. योग्यवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांमधून यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शयता आहे.
पाऊस आमच्यासाठी अमृतासमान
वासुंदे येथील स्थानिक प्रगतिशील शेतकरी बापूसाहेब गायखे म्हणाले, हा पाऊस आमच्यासाठी अमृतासमान आहे. खरीप हंगामासाठी योग्य वेळी पाऊस झाल्याने आम्हाला चांगल्या पिकाची आशा आहे. तालुयातील शेतकरी आता पेरणी आणि इतर शेतीच्या कामांना गती देतील. या पावसाने निसर्गाचा समतोल राखण्यासही मदत झाली असून, शेतकर्यांमध्ये नव्या हंगामाबाबत आशावाद वाढला आहे.