पाथर्डी। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण आणि बीड मतदार संघात काटे की टक्कर पाहावयास मिळाली. चुरशीच्या निवडणुकीत मात्र भाजपाला पराभवाला समोर जावे लागले. त्यानंतर निकालाच्या अवघ्या तिसऱ्या दिवसानंतर जिल्ह्यात अनेक घडामोडी घडत असल्याचे चित्र समोर येत आहे.
पारनेर मध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे तर पाथर्डीत एका युवकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुंडे समर्थकांनी पाथर्डी बंदची हाक दिली आहे.
‘पाथर्डी’ राहणार बंद!
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुकवर निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केली. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी चौकशी करत या युवकावर गुन्हा दाखल करून तात्काळ ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाज, तसेच मुंडे समर्थकांच्या वतीने पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.
‘पारनेर’ मध्ये राडा!
पारनेर शहरात दोन गटात जोरदार राडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. काल गृवर दि. १२ वाजण्याच्या सुमारास राहुल झावरे यांच्या वाहनाची तोडफोड करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल झावरे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.