आमदार झाल्यावर कोणते दिवे लावणार आहात? निळवंडेसह वांबोरी प्रश्न उशिरा सुटण्याचे पाप त्यांच्याच करणीचे! शिवाजी कर्डिलेंना राहुरीतील शेतकर्यांविषयी आस्था नाही
थेट भेट / शिवाजी शिर्के
आमदार करा मी कारखाना चालू करतो हे सांगणार्यांनी आधी हे सांगावे की, आमदाराचा आणि कारखान्याचा काय संबंध? तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन आहात ना? जिल्हा बँकेने भूमिका घ्यावी! सहा वर्षे आमचा काहीच संबंध नव्हता. विखेंचा पॅनल आला. आम्ही विरोध केला नाही. प्रसादला जास्ती झालेला ऊस आम्ही या कारखान्याला देण्याची भूमिका घेतली. आता कारखाना तुमचा, जिल्हा बँक तुमचीच, राज्यात सरकार तुमचेच, केंद्रात सरकार तुमचेच! म्हणजे गल्ली ते दिल्ली तुमचीच सत्ता असताना इतक्या वर्षात तुम्हा कारखाना सुरू करू शकला नाही! आता आमदार झाल्यावर कोणते दिवे लावणार आहात? राज्य सरकारने या जिल्ह्यातील अनेक कारखान्याला शंभर कोटींची मदत केली. राहुरीला का केली नाही? सत्तेची पोळी भाजण्यासाठी ते हे करत आहेत. राहुरीतील शेतकर्यांविषयी त्यांना आस्था राहिलेली नाही! खरच अस्था असती तर राज्याकडून मदतीची भूमिका का घेतली नाही हे आधी सांगा! पापाचे सर्वाधिक मोठे वाटेकरी तुम्ही आहात हे विसरु नका, अशी खमकी भूमिका घेत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचे विरोधी उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यावर ‘नगर सह्याद्री’ सोबत विशेष मुलाखत देताना हल्लाबोल केला.
चारशे ट्रान्सफॉर्मर बसवले आणखी आठशे बसवील, तुम्हाला त्याचे दु:ख का होते?
३०० ते ४०० नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले. मतदारसंघातल्या शेतीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यामध्ये वीजेचे जाळे निर्माण केल्याने मोठा फरक पडला. दिवसाआड वीजपुरवठा झाल्यानंतर शेतकर्यांना प्रचंड मनस्ताप होतो. तो कमी करण्यासाठी मंत्री म्हणून मी मतदार संघात ४०० ट्रान्सफॉर्मर आणलेत. उद्या जाऊन ही संख्या ८०० करण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि शेतकर्यांना दिलासा मिळावा म्हणून ही संख्या पुन्हा दुपटीने करण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि शेतकर्यांना त्यात आनंद मिळणार असेल तर ते ट्रान्सफॉर्मर मी पूर्ण करणार आणि नव्याने बसवणार यात शंका नाही. शिवाजी कर्डिले स्वतःला शेतकरी म्हणत असतील आणि मानत असतील व त्यांना या गोष्टीचा दुःख वाटण्याचं कारण नाही. शिवाजी कर्डिले स्वतःला शेतकरी पुत्र भूमिपुत्र म्हणून शेतकरी पुत्र म्हणतात. शेतकर्यांची भावना त्यांच्या लक्षात येत नाही. शेतकर्याला काय आवश्यक आहे, त्याच्या दृष्टीने काय योग्य याची जाणीव असली पाहिजे. मी देखील शेतकरीच आहे. दुर्दैवाने शिवाजी कर्डिले यांना शेतकर्यांच्या जीवनातील मुख्य प्रश्न काय याची त्यांना जाणीव नाही.
‘यांच्या’ तालमीत वाढलेला मी बछडा!
वाघीणीचं दूध पिलोय; माझ्या संयमाचा अंत पाहाल तर गाठ माझ्याशीच!
संयम बाळगायचा आणि त्याच संयमातून जनता सोबत येत असते. दांडक्याची भाषा बोलून नाही. तुम्हाला कायम दहशत, गुंडगिरीची भाषा बोलण्याची सवय झालीय कारण ते तुमच्या रक्तात आहे. माझे कुटुंब संस्कारी आहे. प्रेमाने जग जिंकण्याचे संस्कार माझे आजोबा, वडिल यांनी जसे माझ्यावर केले तसेच माझा आदर्श असणारे आदरणीय पवार साहेब यांच्या संस्कारी तालमीत वाढलेला मी बछडा आहे. मी संयमी आहे. याचा अर्थ माझ्या संयमाचा अंत पाहू नका! माझ्यावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा, त्यांना दम देण्याचा आणि त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा आता यापुढे जराही प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. ‘आरपार’ची लढाई करण्यासाठी मी सज्ज आहे! वाघीणीचं दूध पिलोय; माझ्या संयमाचा अंत पाहू नका!
ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर पळविणारे हेच महाशय;आता ते शहरातच होणार!
राहुरी शहरातल्या ग्रामीण रुग्णालयाचा देखील विषय मोठा विषय होता की पन्नास हजार लोकसंख्येचे हे शहर. जेव्हा मी आमदार झालो त्यावेळेस मी त्या विषयाला हात घातला आणि जी काय जुनी इमारत जी पाडली. मी नगराध्यक्ष असतानाच नगरपालिकेची तात्पुरती इमारत ग्रामीण रुग्णालयाकरिता उपलब्ध करून दिली होती. ग्रामीण रुग्णालय उभारण्याबाबत जागेच्या मालकी हक्क संदर्भात काही वाद होते. सरकारी विषय असल्याने त्यात तोडगा काढणे अवघड! अनेक बैठका मी घेतल्या. त्यातून मार्ग निघाला आणि त्यात भाजपा सरकारे हे रुग्णालय शहरापासून बाहेर तीन- चार किलो मिटर अंतरावर नेण्याचा निर्णय घेतला. मी आमदार असताना मला अंधारात ठेवले. हा विषय मी विधानसभेत मांडला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मला बैठक लावण्याचा आश्वासन दिल्यानंतर बैठक झाली. त्यानंतर हे रुग्णालय राहुरी शहरामध्ये झालं पाहिजे अशी भूमिका सरकारने जाहीर केली.
अत्यंत देखणे बसस्थानक आणि राहु-केतू मंदिराचे प्रवेशद्वार होणार!
राहुरी शहरामध्ये राहू केतूचं मंदिर आहे. नगर मनमाड हायवे वर मोठी कमान तयार केली जाईल आणि त्या कमानीला राहू केतूचं नाव असेल. शिर्डी- शिंगणापूरकडे जाणारा भाविक या मंदिरात येईल आणि त्याद्वारे बाजारपेठेला आणखी वैभव प्राप्त होईल अशी त्यामागील भूमिका आहे. राहुरी बसस्थानकाला अत्यंत कमी निधी दिला गेलाय. सध्या काम झाले असले तरी त्यात आमचे सरकार आल्यानंतर मोठा निधी आणून भव्यदिव्य असे शहराच्या वैभवात भर घालणारे बसस्थानक उभे केले जाईल.
निळवंडेचं पाणी शेतकर्यांना देण्याचा शब्द पूर्ण केला! तुमच्यासारखे फोटोसेशन केले नाही!
दहा वर्षे आमदार असणार्यांनी निळवंडेच्या मुद्यावर तीनदा निवडणूक केली. मात्र, प्रत्यक्षात काहीच काम केले नाही. गल्ली ते दिल्ली यांचेच सरकार असताना या कालव्यांबाबत यांनी फक्त थापा मारण्याचे काम केले. या विषयावर समोरासमोर येऊन जाहीर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी थापा मारुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. निवडणुका आल्या की कोणातरी मंत्र्याला बोलायचे, मशिनरी बोलवायची आणि निवडणूक संपली की यांच्यासह मशिनरीही गायब झाल्याचे राहुरीकरांनी पाहिले आहे. खोटं पण रेटून बोलण्याची त्यांची पद्धत आहे. पाठपुरावा करण्यात ते कमी पडले. भाजपच्या काळात या निळवंडे कालव्यांसाठी ५० कोटी ७० कोटी मिळायचे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये १२५० कोटी रुपये या कालव्याच्या कामाला उपलब्ध झाले आणि हा निधी उपलब्ध झाल्यामुळेच या कालव्यांची काम आता पूर्ण होऊ शकली. मी खोटं बोलेल, शिवाजी कर्डिले खोटं बोलतील पण सरकारी आकडे मात्र खोटं बोलणार नाहीत. बाराशे ५० कोटी रुपये जेव्हा या कालव्याच्या कामाला आले त्याच्यामुळे काम झाली त्यातल्या काही प्रशासकीय बाबी ज्या काही राहिलेल्या होत्या त्यामध्ये मी स्वतः लक्ष घातलं सगळ्या अधिकार्यांच्या बैठक घेतल्या. निधी मोठ्या प्रमाणात आणल्यामुळे निळवंडे धरणाच्या कालव्यांचे कामे पूर्ण झाली आणि ते पाणी राहुरी तालुयामध्ये येऊ शकले.
वांबोरी चारीचं बटन त्यांनी अनेकदा दाबलं, मी प्रत्यक्ष पाणी देण्याचं काम केले!
निवडणूक आली की वांबोरी चारीचं बटन कर्डिलेंनी अनेकदा दाबली. मी मात्र प्रत्यक्ष पाणी द्यायचं काम केले. बटन दाबण्यासाठी फक्त देखावे गेले गेले. प्रत्यक्षात काम काही झालं नव्हतं. नंतर मात्र पाणी कधीच आलं नव्हतं. दहा वर्ष ते आमदार असताना या पाण्याचा अभ्यास त्यांनी केला नाही. वांबोरीसाठीचे पाणी काही मर्यादित वेळेमध्ये उचलावे लागते. १४ टीएमसी च्या खाली पाणी खाली पाणी गेलं की उचलता येत नाही. विशिष्ट कालावधीत हे पाणी उचलावं लागतं. त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये एकदाही ते राखीव पाणी उचलू शकले नाहीत. इतकी अनास्था त्यांनी दाखवली. मी आमदार झाल्यावर प्रत्येक वर्षी त्या हक्काच्या पाण्याच्या व्यतिरिक्त आणखीन पाणी देण्याचे काम चालू केले. बारकाईने नियोजन करण्याचे काम मी केले.
वांबोरी चारीची थकीत बिले पदर भरली पण, शेतकर्यांना पाणी कमी पडू दिले नाही!
वांबोरी चारीच्या मुद्यावर खूप काम केले. आमचं सरकार गेल्यावर अधिकार्यांची भाषा बदलली. त्यावेळी बील भरताना उशिर झाला तर मी स्वत: बीले भरलीत. ते काम करताना कुठे होते कर्डिल! फक्त फोटोसेशन करण्यात आणि टक्केवारीच्या कामात इंटरेस्ट! शेतकर्यांना पाणी देण्यात त्यांना टक्केवारी भेटणार नसेल म्हणून त्यांनी त्यात काम केले नाही. मी स्वत: बीले भरली. ठेकेदारांना मी देयके मिळवून देण्याचा शब्द दिला. त्यातून त्यांनी कामे केलीत. विश्वास दिला आणि त्याच्याकडून काम करून घेतले. काम केले तीसरी मोटर चालू झाली आणि आज पाणी गेले हा आनंद आहे. समाधान यागोष्टींचं आहे की शेतकर्यांना पाणी देता आले.
साखर कारखाना अडचणीत आणणारा पडद्यामागील खरा सुत्रधार हेच कर्डिले!
राहुरीकरांसाठी राहुरी कारखाना हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मागील वेळीही हा मुद्दा होता आणि आताही आलाय. कामगारांच्या देण्यासह कारखान्याचेही प्रश्न आहे. निळवंडेप्रमाणे हा देखील मुद्या आहे. या कारखान्यात मी संचालक नव्हतो. ते जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत. जिल्हा बँक तेच चालवतात. हा कारखाना बंद पाडण्यामागे पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या. आमची सत्ता आली अन् त्याचवेळी हा कारखाना डबघाईला आलेला होता. कर्डिलेंनी राजकारण केले. त्याआधी नियम डावलून कर्ज दिले.आम्ही सत्तेत येताच जाणिवपूर्वक कर्ज नाकारले. कारखाना अडचणीत आणण्यात पडद्यामागील खरा सुत्रधार हेच कर्डिले आहेत.
चिरफाड केल्यास हे संचालक मंडळ अंदमान निकोबारला पाठवावे लागेल!
तथ्यहिन बोलण्यात त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही. यावर्षी ज्या कारखान्यांना जिल्हा बँकेने मदत केली, त्याची चिरफाड केल्यास हे संचालक मंडळ अंदमान निकोबारला पाठवावे लागेल. तुमच्या हिताचे, फायद्याचे असले की तिथं नियम पहायचे नाही! जिथं आमच्या सारखे विरोधक आहेत, तिथे जाणिवपूर्वक नियम आडवे आणण्यात कर्डिले यांचा हातखंडा आहे. राहुरीची कामधेनू पडद्यामागून बंद पाडण्याचे हे खरे सुत्रधार!
तुमच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर लढणारा, तुमच्या वेदना कमी करणारा ओळखा!
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे आणि ते अत्यंत दुर्दैवी आहे. द्वेष पसरवून पोळी भाजून कोणी सत्तेत येणार असेल तर घातकच आहे. मी कारताना कोणाची जात पाहिली नाही. या मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला आमदार मंत्री केेले. जातीपातीकडे जाऊन समोरच्याच्या चेहर्यावर हासू आणण्यासाठी, त्याच्या दु:खावर फुंकर मारण्यासाठी मी करतोय! सर्वात महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करायचे आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न दुर्दैवी आहेत. मतदारांनी कोण तुमच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर लढतोय, तुमच्या वेदना कोण कमी करतोय हे ओळखावे आणि मगच मतदान करावे.
विकासाच्या मुद्यावर बोला!
निळवंडेचं पाणी आणलं का? वांबोरी चारीला पाणी आणले का? शेतकर्यांना नवीन डीप्या दिल्या का? नवीन सबस्टेशन आणले का? शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून काही प्रयत्न केले का? राहुरीच्या एसटी स्टँडसाठी काही प्रयत्न केले का? ग्रामीण रुग्णालयासाठी काही प्रयत्न केले का? पाझर तलावाच्या गळती होत असताना ते थांबविण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले का? या अशा मुद्यांवर त्यांनी खरे बोलले पाहिजे. दहा वर्षात शुन्य काम झाले. ज्याला नियोजन करावे लागते, सरकारकडे पाठपुरावा लागतो आणि प्रश्न सोडावे लागतात अशा बाबी कुठेही झाल्या नाहीत. विकासाच्या मुद्यावर बोला! दहा वर्षात त्यांनी काय केले हे त्यांनी सांगावे!
दहा आणि पाच वर्षांंची तुुलना करण्यासाठी समोरासमोर या!
तुमचे दहा वर्षाचे काम आणि माझे पाच वर्षाचे काम यावर एकदा समोरासमोर या! जागा आणि वेळ तुम्ही ठरवा! एकदाचे राहुरीच्या जनतेला समजू द्या! कोण किती कामाचा आहे ते! नुसत्या गप्पा ठोकण्यात काही अर्थ नाही. मला समोरासमोर येण्यात आनंदच वाटेल! हा सूर्य आणि जयद्रथ करण्याची माझी तयारी आहे. मी खोटं बोलणार नाही. आकडे तोंडपाठ आहेत!
आमच्याबद्दल बोलणार्यांनी सुवेंद्र गांधीला वापरलेली भाषा आठवावी!
दहशतीच्या मुद्यावर आमच्यावर बोलणेच हास्यास्पद आहे. आम्ही कधी कोणाला चापट मारली नाही. माणसं प्रेमाणं जिंकण्याची माझी पद्धत आहे. त्यात मी कायम यशस्वी होत आलोय. राग व्यक्त करत असलो तरी वयाने सिनीअर कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मी दिली नाही. त्यांच्यावर एकेरी बोललो नाही. गुंडगिरी, दहशतीबद्दल बोलणार्यांना नैतिक अधिकार आहे का? आम्ही ज्यांना सर्वांचा विरोध डावलून बाजार समितीत संचालक आणि उपसभापती केले, त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला! त्याला त्याबाबत जाणिव करून देणे म्हणजे दहशत असेल तर मग तुम्ही तुमच्याच पक्षाचे सुवेंद्र गांधी यांच्याबद्दल जे बोलला ते जनता विसरली नाही. सुवेंद्र गांधी यांच्या तंगड्या तोडण्याची भाषा तुम्ही केली होती. ती दहशतच होती की प्रेमाची भाषा हे जनता ओळखून आहे. नेहमीचीच त्यांची ही भाषा!
सख्या पुतणीची प्रॉपर्टी लुबाडणारा असा चुलता होणे नाही!
भावाची मुलगी म्हणजे आपली स्वत:ची मुलगी आपण मानतो. त्यांच्या सख्खी पुतणीने झालेला अन्याय समोर आणलाय! दगडाचं काळीज आहे त्यांचं! सख्या भावाच्या मुलीची प्रॉपर्टी गिळंकृत करण्यापर्यंत यांची मजल जात असेल, तर हा माणूस कोणत्या बहिणीचा लाडका भाऊ कसा होऊ शकेल! भाग्यश्री मोकाटेवर दारु विकल्याचा गुन्हा दाखल केला! ही कोणती संस्कृती? निवडणुकीचं ढोंग करणार्यांना जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणातून हद्दपार केले पाहिजे. यातून राज्याला पुरागोमीचं स्वरुप येईल.
दोघांच्याही गुन्ह्यांची यादी वाचा अन् दहशत- दादागिरी कोणाची याचा न्याय करा!
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांचे प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे. त्यानुसार मी माझे दिले आणि कर्डिलेंनीही दिले आहे. वर्तमानपत्रात ते प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी ते इंग्रजीतून दिले आहे. माझ्यावर ईडीचा एकच गुन्हा दाखल आहे. मी भाजपासोबत गेलो असतो तर तो देखील दाखल नसता. मात्र, कर्डिलेंवर वर्तमानपत्राचे पूर्ण पान गुन्ह्यांची यादी आहे. त्यात खुन, खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, फसवणूक, विनयभंग यासह कित्येक गुन्हे आहेत. ही यादी जनतेने वाचावी आणि कोणाची दहशत आहे, कोणाची दादागिरी आहे याचा न्याय करावा! मामाच्या सांगण्यावरुन गुन्हे दाखल केेले हे म्हणणेच हास्यास्पद! ते इकडे येण्याआधी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. राहुरी मतदारसंघात येण्याआधी त्यांनी ते दिवे लावले आहेत.
ते कायम कायदा-नियम तोडत आलेत; त्यांचा याबाबतचा गृहपाठ कच्चा!
करखान्याचे छत्रपतींचे नाव तोडले हा आरोपच चुकीचा आहे. विरोधकांची सत्ता असताना छत्रपतींचे नाव देण्याचा ठराव झाला. मात्र, महापुरुषांची नावे देता येणार नाहीत असे सरकारने सांगितले. या कारखान्याचे देशी दारुचे दुकान होते आणि उत्पादनही! त्या बाटलीवर महाराजांचे नाव आले असते म्हणून ते नाव देऊ नये असे सरकारने संगितले. कायदा, नियम समजून घेण्याची गरज आहे. मुळात त्यांना कायदा-नियम पाळता येत नाही, तर त्यांना कायमच हे कायदे तोडण्याचेच काम करता येते. त्यांचा याबाबतचा गृहपाठ कच्चा असल्याने त्यावर मी अधिकच बोलणं योग्य नाही.
एका बाजुला गुंडगिरी-दडपशाही आणि दुसर्या बाजूला प्रेम!
मतदारसंघात मोठं काम करायचं आहे. याआधीच्या संधीचं सोने करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासाठी गेलो. पण, मंत्रीपद मिळाल्याने प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ माझ्यावर आली. माझ्या परीने पदाला न्याय दिलाय! मतदारसंघातील जनतेने संधी दिल्यास प्रामाणिक,जबाबदारीने आणि नियोजनबद्ध प्रयत्न केेलेत. त्यांची दहा वर्षातील कामे आणि माझी कामे! गुंडगिरी-दडपशाही आणि दुसर्या बाजूला प्रेम याचा विचार करून मला न्याय मिळेल आणि संधी मिळेल असा विश्वास वाटतो.
मागील आणि आताची निवडणूक यात काय फरक वाटतोय?
पहिल्या निवडणुकीत नवीन होतो. पाच वर्षात माझा विधानसभेतील काम, जनतेशी जोडलेले नाते यावर मी सामोरा जातोय. विकास कामांच्या मुद्यावर पाच वर्षात झालेले बदल जनतेच्या समोर आहेत, मला खात्री आहे की जनता माझ्या सोबत राहील.
पवार साहेबांमुळेच आमदार ते थेट मंत्री
संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. जिल्ह्यातून सहापैकी पाचजण पहिल्या टर्मचे होते. मात्र, आमचे वडिल- आजोबा हे आमदार होते. त्यांना संधी मिळाली नव्हती. इजिनिअरींगमधील पोस्टग्रॅज्युएशन ही आणखी एक जमेची बाजू! त्यामुळेच माझ्यातील गुण हेरून पवार साहेबांनी मला संधी दिली आणि मी त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
वीज खात्यामुळे शेतकर्यांना न्याय देता आला!
शेतकर्यांच्या विषयीची विजेची जी धोरणे होती ती आम्ही सत्तेवर आल्यावर वर्षभरामध्ये बदलली आणि त्या माध्यमातून या राज्यामध्ये शेतीच्या जो वीज पुरवठा आहे, त्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याला बळकटी देण्याचं काम आम्ही अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये केलं. मतदारसंघांमध्ये देखील प्रचंड मोठ्या पायाभूत सुविधांचे जाळे पहिल्या अडीच वर्षांमध्ये निर्माण केलं. आणखी दीड दोन वर्षे मिळाले असती तर खूप मोठा फायदा या मतदार संघाला तर होऊ शकला असता. मात्र, भारतीय जनता पक्षांना आमचं सरकार उलटवलं. त्यात मोठा तोटा विजेच्या प्रश्नाचा झाला.