मुंबई। नगर सहयाद्री-
शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा आणखी एक धक्का बसणार आहे. सध्या ‘उबाठा’कडे असलेले मशाल चिन्ह देखील जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय येथे ठाकरे यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र येथे देखील शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळण्यात आली. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतरही ठाकरे यांच्या अडचणी थांबण्याची चिन्हे नाहीत.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर देखील समता पक्षाने दावा सांगितला आहे. त्यामुळे मशाल चिन्ह ठाकरे यांच्या हातून जाण्याची शयता आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समता पक्षाला मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचा दावा समता पक्षाने केला आहे. ४ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे. ११ जानेवारीपासून ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिले जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. तसेत समता पक्षाने सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल चिन्ह काढूण घेतले जाण्याची शयता आहे.