मुंबई / नगर सह्याद्री : राजकीय नेत्यांमधील संघर्षाचे पडसाद हे सगळीकडेच उमटताना दिसतात. बऱ्याचदा सोशल मीडियावरही याबाबत आक्रमक चर्चा होताना दिसतात. बऱ्याचवेळा सोशलमिडीयावर आपली बाजू मांडण्यासाठी अनेक लोक आक्षेपार्ह भाषेचा वापर करताना दिसतात. (Sharad Pawar)
आता हेच वागणे एका सुशिक्षित तरुणाच्या अंगलट आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाला १४ दिवसांची कोठडी मिळाली आहे. विशाल गोर्डे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर फेसबुकद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विशाल गोरडे याच्याविरूद्ध तक्रार करण्यात आली होती. लवकरात लवकर याला अटक करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली,
नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल,” असा इशारा घाणेकर यांनी दिला होता. त्यानंतर मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या विशाल गोर्डे या एमबीएचं शिक्षण घेतलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. गोर्डे याला वाशी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी विशाल गोर्डेने जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.