मुंबई । नगर सहयाद्री:-
देशात सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच राज्यातही राजकीय धुळवड साजरी होताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
आजच्या धुळवडीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही ऑफर दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. एक वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असे म्हटले आहे. आता यावर महायुतीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नाना पटोले यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना नाना पटोले यांनी, आपण सर्वजण होळीचा सण हसत खेळ साजरा करतो. मी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा देतो. तसेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शुभेच्छा देतो. त्यांनी राज्यासाठी लढावं असं मला वाटतं. पूव ते भूमिका घ्यायचे आताही तशीच भूमिका घ्यावी, यासाठी मी शुभेच्छा देतो. असे म्हटले आहे.
पुढे एकनाथ शिंदे व अजित पवार यांना शुभेच्छा देताना पटोले यांनी, त्या दोघांची गत फार वाईट आहे. आपला पक्ष टिकेल की नाही अशी त्यांची अवस्था आहे, किंवा त्यांच्या मनात भीती आहे. ही भारतीय जनता पाट त्यांना जगू देणार नाही. कारण भाजपाची ती सवयच आहे. देशात त्यांनी जिथे-जिथे, ज्या-ज्या पक्षांबरोबर युती केली त्या सर्वांना भाजपाने संपवून टाकलं. आता तुम्ही पाहतच आहात की भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या सर्व योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की आता एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी सतर्क व्हायला हवं. आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच. असे म्हटले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, मी त्यांना होळीच्या शुभेच्छा देताना केवळ त्यांच्या सुरक्षेबद्दलची भूमिका मांडली आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं म्हटलं. त्यावर पटोले यांना पुन्हा विचारण्यात आलं की सोबत आहात म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार की त्यांना तुमच्याकडे बोलवणार? या प्रश्नावर उत्तर देताना पटोले म्हणाले, अर्थात आम्ही त्यांना आमच्याकडे बोलवणार. कारण आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत. असे म्हटले.
पुढे नाना पटोले यांनी, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू. त्या दोघांचीही तशी इच्छा आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे आम्ही एकाला काही दिवस आणि दुसऱ्याला काही दिवस असं दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू. अशी थेट ऑफरच त्यांनी दिली.
ऑफरवर बावनकुळेंचा नाना पटोलेंना सल्ला
नाना पटोले यांना होळीच्या दिवशी चांगला सल्ला आहे. विरोधी पक्षाचे मॅन्डेट आहे. विरोधीपक्ष म्हणून पाच वर्ष काम करा. पुन्हा जनतेचा विश्वास मिळवा आणि जनतेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवा. हेच त्यांच्यासाठी योग्य आहे. अशा ऑफर्स वैगेरे महायुतीचे कुणी नेते ऐकत नाही. आम्ही विकासाला पुढे नेण्यासाठी काम करत आहोत. अशा ऑफरसाठी काम करत नाही. एवढेच नाही, तर त्यांनी विरोधीपक्षात राहून सरकारला चांगल्या सूचना द्याव्यात आणि विकासासाठी मदत करावी. होळीच्या दिवशी, सर्व मनभेद मतभेद बाजूला सारून आपण एकत्रितपणे महाराष्ट्र पुढे नेऊया, असेही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.