जुन्नर / नगर सह्याद्री : सध्या केंद्रात भाजप सरकार आहे. महाराष्ट्र महायुतीचे सरकार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. परंतु सर्वाधिक आमदार असूनही आधी विरोधी पक्षात व आता उपमुख्यमंत्रीपदावर भाजप आहे. आता हाच धागा पकडत भाजपाचा दिल्ली दरबार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule News) यांनी केलाय.
भाजपाने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची दोन वेळा पदावनती केली आहे, दिल्लीत एका मराठी माणसाचा अपमान केला जात असल्याने मला वाईट वाटतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या तिसऱ्या दिवसाची आज (शुक्रवार, २९ डिसेंबर) सकाळी जुन्नर येथून सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. दुर्दैवाने आता भाजपाचं सरकार असूनही ते मुख्यमंत्रीपदी कायम राहिले नाहीत. त्यांना फारसे अधिकारही दिले जात नाहीत. महाराष्ट्रातला एक कर्तृत्ववान नेता मोठा झाला,
मुख्यमंत्री झाला, परंतु, तुम्ही (भाजपा) त्यांना आता उपमुख्यमंत्री केलं आहे. तुम्ही त्यांचा आणखी किती अपमान करणार आहात? देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते. मग तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केलंत. त्यानंतर आता अर्धे उपमुख्यमंत्री केलं आहे. हा फडणवीस यांच्यावरचा अन्याय नाही का? मी विरोधक म्हणून बोलत नाही. एखादा नेता कष्ट करत असेल, स्वतःच्या ताकदीवर १०५ आमदार निवडून आणत असेल तर त्याचा मानसन्मान करायला नको? असा सवाल त्यांनी केला.