अहिल्यानगर । नगर सहयाद्री : –
येथील तोफखाना परिसरातील एका घरातून दोघा अल्पवयीन मुलांनी तीन लाख 92 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी भरदिवसा घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी तत्काळ तपास करत चोरी करणार्या दोघा अल्पवयीन मुलांना दागिन्यांसह ताब्यात घेतले.
याप्रकरणी अजय हर्षकांत सासवडकर (वय 32) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सासवडकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ते आपल्या कुटुंबासह विठ्ठल मंदिरामागे, तोफखाना येथे राहतात. त्यांचे घर तीन मजली असून, पहिल्या मजल्यावर वडील हर्षकांत आणि आई कामिनी, दुसर्या मजल्यावर स्वतः अजय सासवडकर कुटुंबासह, तर तिसर्या मजल्यावर चुलती मोहीनी राहत आहेत.
वडील हर्षकांत यांना आरोग्यविषयक त्रास असल्याने ते उपचारासाठी आईसोबत नेहमी बाहेरगावी जात असतात. शनिवारी सकाळी नऊ वाजता वडील व आई घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दुपारी सुमारे तीन वाजता वडील हर्षकांत व भाऊ अभिजीत घरी परतले असता, घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
तोफखाना पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी पथकासह तात्काळ घटना पाहणी केली. सदरचा गुन्हा अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती मिळताच साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांनी घरात लपवून ठेवलेले दागिने हस्तगत केले.
उपनिरीक्षक शैलेश पाटील, अंमलदार सुनील शिरसाठ, सुनील चव्हाण, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, अहमद इनामदार, वसिम पठाण, सुरज वाबळे, सुधीर खाडे, सुमित गवळी, सुजय हिवाळे, सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, महेश पाखरे, सागर साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.