पारनेर | नगर सह्याद्री
अयोध्या राम मंदीर लोकार्पणाचा कार्यक्रम संपूर्ण भारतीयांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा आहे. ज्यांना आपले पक्ष सांभाळता आले नाही त्यांना प्रभू रामचंद्रा बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पण मला खात्री आहे की अशा सर्व लोकांना देवाच्याच आशीर्वादाने खड्यासारखं वेचून बाजूला फेकल्याशिवाय जनता राहणार नाही असा विश्वास कोरठण खंडोबा येथे बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीक्षेत्र कोरठाण खंडोबा या ठिकाणी देवाची महारती व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, अयोध्या या ठिकाणी राम मंदिर व्हावे म्हणून संघर्षमय वाटचालीतून अनेक लोकांच्या प्रयत्नातून कार सेवकांच्या बलिदानातून अनेक भक्तांनी समर्पित भावनेतून काम केलं सगळ्यांच्या एकत्रित यशाचा परिणाम म्हणजेच आयोध्याला राम मंदिरात राम लल्लाची स्थापना होत आहे.
ही आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक घटना म्हटली पाहिजे. कोरठण खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी यापूर्वीही निधी उपलब्ध करून दिला आहे. देवस्थानच्या पुढील काळात विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.