spot_img
अहमदनगरहिरव्या गुलालाचा उन्माद पवारांना नडला! उशिरा ठरलेल्या उमेदवाऱ्या अन्‌‍ जिरवाजिरवीच्या सुपाऱ्याही

हिरव्या गुलालाचा उन्माद पवारांना नडला! उशिरा ठरलेल्या उमेदवाऱ्या अन्‌‍ जिरवाजिरवीच्या सुपाऱ्याही

spot_img

बाळासाहेब थोरातांसह नीलेश लंके यांच्या भूमिका महाविकास आघाडीत ठरल्या मारक | उशिरा ठरलेल्या उमेदवाऱ्या अन्‌‍ जिरवाजिरवीच्या सुपाऱ्याही!

सारिपाट / शिवाजी शिर्के:-
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली जोरात चालू झाल्या असल्या तरी जिल्ह्यातील यश- अपयशात नक्की कोणते फॅक्टर कारणीभूत ठरलेत याची चर्चा थांबायला तयार नाही. चर्चेच्या केंद्रस्थानी बाळासाहेब थोरात यांचा पराभव आणि राधाकृष्ण विखे पाटलांची भूमिका आहे. शिवाय कधीकाळी काँग्रेसचा आणि त्यानंतर अलिकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बालेकिल्ला झालेला डाव्या विचारांचा जिल्हा भगवा जिल्हा झाला. हिंदू विरुद्ध मुस्लिम असं मतांचे ध्रुवीकरण करत राष्ट्रवादीने लोकसभा जिंकली आणि त्याचा उन्माद करण्यात आला. तोच उन्माद राष्ट्रवादी शरद पवार गटाला भारी पडला. विधानसभेच्या निकालातील आकडेवारी आणि विजयाचं विश्लेषण करताना हिंदू समाज संघटीत झाला आणि त्यांनी मतदानही संघटीतच केले! खरे तर जातीय धु्रवीकरणातील हे मतांचे विभाजन भविष्यात जातीय सलोख्याच्या आड येणार ठरेल की काय अशी शंका आता येऊ लागली आहे. मुस्लिम समाजात असुरक्षीततेची भावना निर्माण होण्यास भाजपाचा प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा कारणीभूत ठरला असे मानले तर दुसरीकडे त्या विरोधात भूमिका घेत मुस्लिम मतदारांना संघटीत होण्यासाठीची पडद्यामागची भूमिका महाविकास आघाडीतील साऱ्याच नेत्यांनी घेतली हेही नाकारता येणार नाही.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिम मतदार आपल्या बाजूने राहिला हे सांगताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसची नेते मंडळी अंगभर हिरवा गुलाल खेळली. मात्र, त्यातून हिंदू मतदारांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली. अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर जाहीर करण्यात आल्यानंतर पवारांना भेटलेल्या शिष्टमंडळात त्यास विरोध करण्यात आला. पवारांनी लागलीच त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने संधी साधली आणि या नामकरणास आपला विरोध असल्याची भूमिका घेतली. त्याआधी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी, ‌‘माझ्या विजयात मतदारसंघातील मुस्लिम बांधवांची भूमिका महत्वाची ठरली, त्यांचे मोठे उपकार आहेत.

मी त्यांना कधीच विसरणार नाही‌’, असं स्टेटमेंट मिडियासमोर दिले. खरंतर त्यावेळी लंके यांनी ही प्रतिक्रीया उत्स्फर्तपणे दिली होती. त्यात गैर काहीच नव्हते. मात्र, जबाबदार आणि संयमी नेतृत्व म्हणून बोलताना काही मर्यादा पाळायच्या असतात हेच ते विसरुन गेले. त्यातूनच त्यांची ती प्रतिक्रिया यावेळी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात व्हीडीओच्या स्वरुपात व्हायरल झाली. त्याचे पडसाद बाराही मतदारसंघात उमटले. हिंदू मते राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या विरोधात जाण्यास हीच क्लीप कारणीभूत ठरली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संगमनेरमध्ये चार महिन्यांपूव मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री करणाऱ्या गाड्या पकडण्यात आल्या. त्यासाठी खास पथक संगमनेरमध्ये दाखल झाले होते. काही टनात गोमांस सापडून देखील कोणावरच कारवाई न करता हे पथक दुसऱ्या मिनिटाला संगमनेरमधून बाहेर पडले. संगमनेरमधील मुस्लिमांना बाळासाहेब थोरात यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्यामुळेच हा समाज कायम आक्रमक राहतो असा प्रचार केला गेला. मागील घडलेल्य काही घटनांचा विचार करत संगमनेरकरांना तो प्रचार भावला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात थोरात यांच्या विरोधात मतदार बाहेर पडला.

पुणे रस्त्यावरील सुपा टोलनाक्यावर गोमांस करणारी वाहने हिंदू संघटकांनी पकडली आणि त्यातील काही तरुणांना मारहाण केली. प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. या घटनेत खा. निलेश लंके यांनी नगर शहरातील त्या तरुणांना पाठीशी घातल्याचा आरोप झाला. त्याचे व्हीडीओ या निवडणुकीत नगर शहरात व्हायरल झाले आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला.

बाळासाहेब थोरातांचा पत्ता कट करता-करता पटोलेंनी काँग्रेस संपवून टाकली!
लोकसभेत मिळालेल्या यशाची हवा डोक्यात गेलेल्या काँग्रेस नेत्यांपैकी नाना पटोले हे एक नाव! लोकसभेत सर्वाधिक जागा मिळाल्याने राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार म्हणजेच आपणच मुख्यमंत्री होणार हे नाना पटोले यांना वाटू लागले. त्यांच्या या भावी मुख्यमंत्रीपदाच्या वाटेत मोठा अडसर होता तो बाळासाहेब थोरात यांचा! थोरातांचा अडसर दूर झाला तर आणि तरच आपली वण लागू शकते हे नानांनी हेरले! यातूनच नाना पटोले यांनी खेळी खेळण्यास प्रारंभ केला. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महाविकास आघाडीतील जागा वाटपात काँग्रेसला कोणत्या जागा घ्यायचा आणि किती जागा घ्यायच्या याचं भांडण सर्वात आधी उकरुन काढले ते नानांनी! दुसरीकडे शिवसेनेकडून संजय राऊत यांनी नानांच्या भूमिकेला विरोध करण्याचे काम केले. त्यातून दोघांमध्ये काही दिवस अबोलाही राहिला. त्यातून चुकीचा मेसेज बाहेर गेला. नानांनी नेहमीप्रमाणे ताठर भूमिका घेतली. शेवटच्या टप्प्यात दिल्लीतील श्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी दिली. त्यातून नाना दुखावले. दुखावलेल्या नानांनी मग त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. नाना पटोले यांना माननारा वर्ग नगर जिल्ह्यात फारसा नसला तरी थोरातांना उपद्रव करेल असे काही घटक नानांना माहिती होतेच! नानांनी पडद्याआडून त्यांच्याशी आणि त्यांनी नानांशी असा दुहेरी संपर्क ठेवला. थोरात यांना कोंडीत पकडण्यासाठीची संधी पडद्याआड राहून साधण्याचे काम नानांकडून झाले. कोणत्याही परिस्थितीत थोरात निवडून येणार नाही याची काळजीच नानांनी घेतली. जिल्ह्यातील पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यांना नानांकडून इनपूट जाऊ लागले. संगमनेरमध्ये नानांच्या सांगण्यावरुन थोरात यांच्या विरोधात मतदान नक्कीच झाले नाही. मात्र, जिल्ह्यात त्यांना घेरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्या सर्वांच्या संपर्कात कोण- कोण होते याचा शोध घेतला तर आश्चर्यकारक माहिती समोर येऊ शकते. नगर जिल्ह्यातील जागा घेताना काँग्रेस कार्यकर्त्यांवर थोरातांनीच अन्याय केला अशा बातम्या याच निवडणुक कालावधीत पेरल्या गेल्या. त्यातून थोरात यांच्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची मोहीम फत्ते झाली. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत थोरात हाच अडसर राहणार असल्याने त्यांचा पत्ता कट कसा होईल याची काळजी घेणाऱ्या नानांनी उमेदवारी देताना काँग्रेसच्या उमेदवारांना उद्याच्या काळात मुख्यमंत्रीपदासाठी माझ्यासोबत राहावे लागेल असा शब्दही घेतल्याची चर्चा आहे. याशिवाय काही ठिकाणी उमेदवारी देताना व्यवहार झाल्याचीही चर्चा झडली. विधानसभेचा निकाल पाहता आणि काँग्रेसच्या निवडून आलेल्या जागा पाहता त्यांना विरोधी पक्षनेते पद देखील मिळू शकत नाही अशी अवस्था झाली. एकूणच राज्यासह नगर जिल्ह्यातील काँग्रेसची जी काही दयनीय अवस्था झाली त्यास नाना पटेोले यांची दुटप्पी भूमिकाच कारणीभूत ठरल्याची चर्चा झडत आहे.

 

शिवसेनेत फंदफितुरी!
रंग दाखविणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर विक्रम राठोड यांचा निशाणा!
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर समोर आलेल्या मतांच्या आकडेवारीवरुन स्व. अनिल राठोड यांचे चिरंजीव माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी त्यांच्या ‌‘खास स्टाईल‌’मध्ये शहरातील गद्दार शिवसेना पदाधिकाऱ्यांना चिमटा काढलाच! सोशल मिडियावर त्यांनी एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी, ‌‘ अनेकांनी यंदाच्या ही निवडणुकीत दरवषप्रमाणे आपले रंग दाखवलेच पण मी मात्र मित्राच्या मागे खंबीरपणे उभा राहिलोल‌’, असं म्हटले आहे. त्यांनी नामोल्लेख टाळला असला तरी त्यांचा रोख काही मोजक्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवरच असल्याचे स्पष्ट आहे. नगर शहराचा मध्यवत भाग समजल्या जाणाऱ्या माळीवाडा भागातून संग्राम जगताप यांना मोठे मताधिक्य मिळाले. शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचा वरचष्मा या भागात असतो. याच भागात मविआ उमेदवार कळमकर यांना कमी मते मिळाली. विक्रम राठोड यांचा रोख या दोघांकडेच असल्याचे बोलले जात आहे.

विक्रम राठोड यांनी सोशल मीडियावार टाकलेली पोस्ट जशीच्या तशी….!
मस्कार, सर्व नगरकरांना सस्नेह जय महाराष्ट्र.
मला आपल्या सगळ्यांचे आज आभार मानायचे आहेत. आभार मानायचे आहेत त्या ऐंशी हजार नगरकरांचे ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला मतरुपी दान दिले. ‌‘हिंदू धर्मरक्षक‌’ अशी पदवी ज्यांना आपण प्रेमाने दिलीत आणि ज्यांनी ती पदवी यथार्थपणे सांभाळली अशा लोकनेते असणाऱ्या ‌‘स्वर्गीय अनिल भैय्या राठोड‌’ यांच्या निर्वाणानंतरची ही पहिली निवडणूक. ज्यांना ज्यांना अनिल भैय्यांनी अगदी हाताला धरून मोठं केलं, राजकारणात आणलं, राजकारण शिकवलं असे त्यांचे सगळे शिलेदार एकामागून एक त्यांनाच पाठ दाखवून निघून गेले. पण तरीही अनिल भैय्या यांनी राजकारणात कोणतही वाकडं पाऊल उचललं नाही. ते आपलं काम करत राहिले.त्यांनी सगळ्यांना कायम एकच शिकवण दिली आपल्याबरोबर असणाऱ्या आपल्या मित्रांना, कार्यकर्त्यांना कधीही दुखवायचं नाही आणि अडचणीच्या प्रसंगात कधीही त्यांना एकट टाकायचं नाही. तेच संस्कार आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहोत. यंदाच्या निवडणुकीतही मी तेच वाक्य लक्षात ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला.अनेकांनी यंदाच्या ही निवडणुकीत दरवषप्रमाणे आपले रंग दाखवलेच पण मी मात्र मित्राच्या मागे खंबीरपणे उभा राहिलो.
– विक्रम अनिलभैय्या राठोड

ठाकरेंच्या भोपळ्यास जबाबदार ठाकरेच!
नगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला जरी नव्हता तरी तो अभेद्य किल्ला नक्कीच होता. मात्र, त्याचे बुरुंज ढासळत असताना तो सावरला पाहिजे, दुरुस्त झाला पाहिजे, डागडुजी झाली पाहिजे असा काडीचाही प्रयत्न गेल्या दहा वर्षात झाला नाही. विजय औटी यांच्या रुपाने शिवसेनेचा एकमेव आमदार असताना आणि पुढे जाऊन त्यांना लाल दिवा मिळाला असताना त्यांच्याकडून शिवसेना वाढीचे प्रयत्न होण्याऐवजी शिवसेना संपेल कशी याचीच जास्त काळजी घेतली गेली. औटी यांच्याकडून शिवसैनिकांना न्याय मिळत नाही, ते वेळ देत नाहीत अशा तक्रारींचा पाऊस मातोश्रीवर पडला असतानाही त्याची दखल घ्यावी असे उद्धव ठाकरे यांना वाटले नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शिवसेना मंत्री म्हणून शंकरराव गडाख यांच्यावर जबाबदारी आली असताना त्यांच्याकडून काहीच काम झाले नाही. अनिल राठोड यांच्यासारखा ढाण्यावाघ आजही नगरकरांना मिळायला तयार नाही. औटी- गडाख यांनी कायम शेळीसारखीच भूमिका निभावली. आताच्या निवडणुकीत शिवसेनेला नगर आणि पारनेरची जागा मिळाली असती तर आजच्या निकालाचे चित्रच वेगळे असते. या दोनही जागा शिवसेना ठाकरे गटाने सहज जिंकल्या असत्या. मात्र, या दोन्ही जागांची मागणी जागा वाटप बैठकीत केली गेली नाही. उलटपक्षी ज्या श्रीगोंद्यात शिवसेनेचे काहीच युनीट नसताना तेथील जागा संजय राऊत यांनी भांडून घेतली. त्यातून तेथील स्थानिक राष्ट्रवादी पवार गट नाराज झाला. नगर आणि पारनेरच्या बदल्यात श्रीगोंदा घेताना मोठी सौदेबाजी झाली आणि त्यात संजय राऊत हेच अडकले असल्याचे स्पष्टपणे समोर आले. शिवसैनिकांची नाराजी कमी व्हावी यासाठी कोणताही प्रयत्न शिवसेना नेतृत्वाकडून झाला नाही. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. नेवासा जिंकेल असे वाटत असताना प्रत्यक्षात गडाख यांची विकेट गेली. श्रीगोंद्याची उमेदवारी नागवडे यांना जाहीर झाली त्याचवेळी ही जागा महाविकास आघाडी हरणार हे स्पष्ट होते. मग, असे असताना संजय राऊत यांनी त्या जागेचा आग्रह का धरला होता या प्रश्नाचे उत्तर शिवसैनिकांना अद्यापही मिळायला तयार नाही. संजय राऊत यांच्याकडून बाजार मांडला गेला असल्याची ओरड सुरू असताना उद्धव ठाकरे याबाबत अवाक्षरही बोलले नाही. म्हणजेच येथील शिवसेना संपविण्यास राऊत हे जबाबदार असल्याचे वरकरणी दिसत असले तरी प्रत्यक्षात उद्धव ठाकरे हे त्यास जबाबदार आहेत!

विजय भास्करराव औटींना का पाडावे लागले उघडे?
कायम डावा विचार जपताना तालुक्यात चांगले काही तरी व्हावे अशी भूमिका घेत पंचायत समितीच्या राजकारणात सक्रिय झालेल्या विजयराव औटी यांनी जिल्हा परिषदेत काम केले. त्याआधी सेनापती बापट पतसंस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील अडल्या-नडलेल्यांना आर्थिक हातभार देण्याचे कामही केले. (त्यांनी स्थापन केलेली हीच पतसंस्था आज हजारो ठेवीदारांच्या हिताआड आलीय आणि काहींच्या ठेवी मिळत नाहीत म्हणून त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागलेत. असे असताना त्या ठेवीदारांना किमान शब्दभर आधार देण्याचे काम असताना त्यांना दारातूनच हाकलून लावणारे हेच ते विजयराव! त्याबद्दल न लिहीलेले बरे!) सबाजीरावांनी तयार केलेल्या ग्राऊंडवर थेट मोतोश्रीतून उमेदवारी आणून बॅटींग करता करता तीन वेळा आमदारकी त्यांना जनतेने दिली. त्यात कट्टर शिवसैनिकांचे योगदान प्रचंड! मात्र, त्या शिवसैनिकांना सन्मान सोडा साधा चहा देखील मिळाला नाही. ‌‘माणूसघाणा‌’ नेता म्हणून ओळख निर्माण झाली असताना ती पुसावी यासाठी काहीच प्रयत्न त्यांच्याकडून झाले नाही. तरीही जनतेने त्यांना पंधरा वर्षे संधी दिली. त्याचे कारण त्यांच्याकडून झालेली विकासकामे! मात्र, कार्यकर्त्यांसह गावागावातील पुढाऱ्यांचा सातत्याने अपमान आणि पानउतारा यातून वैतागलेल्या पारनेरकरांनी निलेश लंके हा पर्याय निवडला. यानंतर विजयराव जमिनीवर येतील असे वाटत असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. बाजार समिती- खरेदी विक्री संघ निवडणुकीत विजयरावांनी निलेश लंके यांच्या गळ्यात गळा घातला. हा निर्णय त्यांचा सर्वस्वी एकट्याचा! तरीही शिवसैनिकांनी तो स्वीकारला. मात्र, तो अनेकांना रुचला नव्हता. पुढे जाऊन लोकसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता एकट्यानेच विखे पाटलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेऊनही विजयराव घरात बसून राहिले. गेल्या पाच वर्षात निलेश लंके यांच्याकडून गावागावातील शिवसैनिक, औटी समर्थक सरपंच व पदाधिकारी यांना टार्गेट करण्याचे काम झाले. काहींवर गुन्हे दाखल झाले. घनश्याम भळप सारखा पोलिस अधिकारी कामाला ठेवल्यागत लंके यांच्या आदेशावर शिवसैनिक आणि औटी समर्थकांना डांबून ठेवत होता आणि यात लक्ष घालण्याची विनंती करण्यासाठी विजयरावांच्या दारात गेलेल्या कार्यकर्त्याना हाकलून लावले जात होते. ‌‘माझे काहीच चालत नाही, मी काहीच करु शकत नाही,‌‘ असे सांगणारे हेच ते विजयराव! तरीही त्यांनी विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल केला. तालुक्याच्या भल्यासाठी, तालुक्याला नवी दिशा देण्यासाठी अर्ज दाखल करतोय, असा आशय असणाऱ्या पोस्ट त्यांनी स्वत:च तयार केल्या आणि स्वत:च त्या शेअर केल्या. व्हाटसअप गु्रुपवर त्या पोस्ट टाकल्यानंतर त्या कोणी शेअर करत नव्हते आणि लाईक तर कोणीच करत नव्हते. तरीही त्यांनी अर्ज ठेवलाच! अर्ज ठेवल्यानंतर प्रचाराच्या पोस्ट ते स्वत:च टाकत राहिले. कोणीही त्याची दखल घेत नव्हते आणि शेअरही करत नव्हते. मात्र, असे असतानाही त्यांनी स्वत:चा अर्ज मागे घेतला नाही. विजयरावांचे प्रखर विचार आणि मांडणी याला तोडच नाही. त्यांच्या या मांडणीवर गावागावात चर्चा होऊ लागली. (नव्हे, ती जाणिवपूर्वक घडवून आणली जाऊ लागली.) विजयरावांच्या पोस्ट कोणत्याच व्हाटसअप ग्रुपवर कोणीच शेअर करत नव्हते आणि लाईक देखील करत नव्हते. तरीही त्यांच्या भाषणाची, त्यांच्या विचारांची होत असलेली चर्चा पाहून काहीतरी काळेबेरे शिजत असल्याचा वास आला. त्याच्या खोलात गेलो असता कोणाची तरी मते खाण्यासाठीच त्यांची उमेदवारी असल्याचे स्पष्टपणे समोर आले. काशिनाथ दाते यांनी विजयरावांना तीनदा आमदार करण्यात मोलाची आणि महत्वपूर्ण भूमिका बजावली. ज्यांच्यामुळे आपण पराभूत झालो त्या निलेश लंके यांना पराभूत करण्यासाठी काशिनाथ दाते यांना मदत करण्यात विजयरावांचा मोठेपणा दिसून आला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. स्वत:ची उमेदवारी ठेवली. दहा हजार मतांपर्यंत ते जाऊ शकले असते. मात्र, ही दहा हजार मते विजयी मते न होता कोणाच्या तरी विजयाची शिडी होणार हे स्पष्टपणे समोर येत होते. याचाच अर्थ त्यांची उमेदवारी कोणाला तरी पाडण्यासाठी असल्याचे समोर आल्याने ‌‘नगर सह्याद्री‌’ला त्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी लागली. कोणाची तरी सुपारी घेऊन कोणाच्या तरी शिडीचा वापर करताना आपल्यासाठी गावागावातील ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्या, पोलिस ठाणे पाहिले आणि तेथील तुरुंग पाहिले त्यांचे काय याचा जराही विचार न करता असा स्वाथ- मतलबी विचार करणाऱ्यांच्या विरोधात आमचा हा सारिपाट यापुढच्या काळात देखील अधिक तीव्रतेने मांडला जाईल इतकेच!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! दोन बाळांचे मृतदेह बॅरेलमध्ये तरंगताना दिसले; कुठे घडली घटना?

Maharashtra Crime News: धक्कादायक घटनेनं तालुक्याच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका घरात दोन...

मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांची माघार?; केंद्रात मंत्री होणार..

मुंबई । नगर सहयाद्री:- महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि...

शहरात हिट अँड रन प्रकरण! आ. संग्राम जगताप तात्काळ नगरला; मयत तरुणाच्या कटूंबाची घेतली भेट

आ. जगताप यांनी घेतली हिट अँड रन घटनेतील मयत तरुणाच्या कुटुंबियांचे भेट अहिल्यानगर । नगर...

महिलांनी डोळ्यात मिरची पावडर फेकली तर टोळक्याने केले सपासप वार! भयंकर घटनेनं फोडला घाम..

Maharashtra Crime News: महिलांनी डोळ्यात मिरची पावडर फेकली तर टोळक्याने कोयत्याने सपासप वार करत...