नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या कडक पावलामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-काश्मीरच्या गुरेज आणि तंगधार सेक्टरमध्ये आज रात्रभर सीमेपलीकडून गाेळीबार करण्यात आला. त्याला भारतीय सैन्यानेही सडतोड उत्तर दिले आहे.
त्यामुळे पाकिस्तानकडून गोळीबार
पाकिस्तान हा भीतीतून रात्रभर गोळीबार करत आहे. पाकिस्तानला ही भीती सतावत आहे की, भारतीय सेना सीमारेषा पार करून पाकिस्तानात घुसू नये. सीमेपलीकडील पाकिस्तानी चौक्यांकडून २५ आणि २६ च्या रात्री मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आल्याचे भारतीय सैन्याने सांगितले. भारतीय सैन्याने छोट्या शस्त्रांच्या साहाय्याने जशाच तसे उत्तर दिले आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
कालही पाकिस्तानकडून गोळीबार
याआधी पाकिस्तानी सैन्याने गुरूवार-शुक्रवार रात्री नियंत्रण रेषा (एलओसी) वर अनेक चौक्यांवरून मोठ्या प्रमाणात गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोट्या शस्त्रांच्या साहाय्याने काही ठिकाणांवरून पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याने याला प्रभावीपणे उत्तर दिले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचे गेले प्राण
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोक मारले गेले होते. तर अनेक नागरिक जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे. या घटनेवरून देशभरात आंदोलने होत आहेत.
या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने अनेक कूटनीतिक उपायांनी पाकिस्तानला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी नागरिकांसाठीचा सार्क व्हिजा निलंबित करण्यात आला. दोन्ही देशातील उच्चायोगातील अधिकाऱ्यांची संख्या कमी करणे यासारख्या गोष्टींचा त्यात समावेश आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने १९६० मध्ये स्वाक्षरी केलेला सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे आणि बदला घेण्याची धमकी देत आहे.