जालना । नगर सहयाद्री:-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी जरांगेंनी केली आहे. सरकारने मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी मान्य करत जीआर देखील काढला. त्यानंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळेल. हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल, असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा देत सांगितले की, महैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरू करा. मनुष्यबळ द्या, अन्यथा नवीलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल. नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही. सरकारच्या चुकांमुळे आम्हाला अडचण येऊ नये. हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या म्हणताच बरेच जण पागल झाले. अभ्यासक ही पागल झाले. विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे. आणखी मोठा आनंद व्यक्त करू. काही लोक बिथरल्यासारखे झाले आहेत. हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल.
मनोज जरांगे यांनी नारायणगड येथे दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मया दसऱ्या मेळाव्याला ज्यांना यायचं आहे ते या. राधाकृष्ण विखे असतील, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस हे मराठ्यांचा अपमान करणार नाहीत. 100 मराठे जिंकले आहेत. आपला विजय बऱ्याच लोकांना पचला नाही. जीआरमध्ये काही चूक झाली असेल तर ती सरकारने बदलायला हवी. आम्हाला बाकी काही माहीत नाही. जर थोड इकडे तिकडे केले येवला येथील एकाचे ऐकून तर लक्षात ठेवा 1994 चा देखील जीआर आम्ही रद्द करण्यासाठी न्यायालयात जाऊ.
मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले तो कोण आहे मला माहित नाही. अशा लोकांना मी मोजत नाही. अशा लोकांना भाव देत जाऊ नका. ओबीसी नेत्यांची इतकी तडफड सुरू आहे म्हणून मराठा लोकांना सांगतो हुशार व्हा. हा जीआर आम्ही गरीब लोकांनी मिळून काढला असून अर्धा महाराष्ट्र परेशान आहे. तसंच, आम्ही कुणावर हल्ला केलेला नाही. आमच्यावरच हल्ले झालेले आहे. गुन्हे मागे घ्यावेच लागतील. काम करत असतील तर आम्ही कौतुक करणार. 17 सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्र द्या अन्यथा मला दसरा मेळाव्यात निर्णय घेता येईल, असा इशारा जरांगेंनी दिला.
मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात छगन भुजबळ हायकोर्टात जाणार
मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह मुंबईत उपोषण केले होते. मात्र उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने जरांगे यांची भेट घेत थेट जीआरच काढला. आठ प्रमुख मागण्यांपैकी जरांगे यांच्या सहा मागण्या सरकारने मान्य केल्या. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश काढला होता. मात्र सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली.
भुजबळ हायकोर्टात याचिका दाखल करणार
आता मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत. याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रे जमा झाल्यानंतर छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील, अशी माहिती आहे.
समीर भुजबळ हे या कायेदशीर लढाईची जबाबदारी सांभाळणार आहेत. राज्य सरकारने विश्वासात न घेता निर्णय घेतल्याची भावना छगन भुजबळांची आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या हक्कांना धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळ यांची आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात छगन भुजबळ पुन्हा मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहेत.
राज्यात आरक्षणाचा वणवा पेटणार, आणखी एक समाज रस्त्यावर, निघणार विराट मोर्चा
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. मराठा समाजाला या आंदोलनाच्या माध्यमातून मोठं यश मिळालं आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. सर्वात मोठी मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतचा जीआर काढण्यात आल्यानंतर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे, ओबीसी समाजाचा या जीआरला विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. या संदर्भात ओबीसी समाज आता कोर्टात देखील धाव घेण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आला असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता बंजारा समाज देखील एसटीतील आरक्षणासाठी एकवटला आहे.
बीड शहरात आज जिल्ह्यातील बंजारा समाजाची व्यापक बैठक संपन्न झाली. आजच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीचा समावेश आहे. त्यासाठी आता 15 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड असा विराट मोर्चा समाजाच्या वतीनं काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा महाराष्ट्रातील सगळे रस्ते आम्ही बंद करू असा इशारा यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात आला आहे. दरम्यान बाजारा समाजानं दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
एकीकडे राज्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे आता बंजारा समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी समाजाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.



