Operation Sindoor: भारताच्या तिन्ही दलांनी मध्यरात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये सर्व अड्डे उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना मोदींनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे, असं ते म्हणाले.
भारतीय लष्कराने जशी तयारी केली होती, त्याच पद्धतीने कोणतीही चूक न करता कारवाई केली आहे. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद क्षण आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी लष्कराचं कौतुक केलं. त्यानंतर मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतानाच, संपूर्ण देश तुमच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जाते. मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. ही कारवाई करायचीच होती, असं पंतप्रधान मोदी यावेळी बैठकीत म्हणाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. संपूर्ण देशाचं आमच्याकडं लक्ष होतं. भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गारही मोदींनी यावेळी काढले.
भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात मुरीदकेस्थित लश्कर ए तोयबाचं मुख्यालय, बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे लाँचिंग पॅड आणि इतर महत्वाची ठिकाणे होती. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. भारताने पाकिस्तानमध्ये मध्यरात्री घुसून कारवाई केली. या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी संरक्षण खाते, परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारताच्या सुरक्षा दलांनी ६ आणि ७ मे रोजीच्या मध्यरात्री १ वाजून ०५ मिनिटांनी कारवाई सुरू केली. दीड वाजेपर्यंत हे हल्ले सुरू होते. जवळपास २५ मिनिटे ही कारवाई करण्यात आली. यात नऊ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली.
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. २२ एप्रिलला हा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या १४ दिवसांनंतर भारतानं बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट, ऑपरेशन सिंदूरबद्दल दिली माहिती
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक
भारतीय लष्कराने काल मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले, ज्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सीमावर्ती नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शाहांनी युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला.