अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कारवाई भारतीय सैनिकांनी केली आहे. आतापर्यंत अशी कारवाई कधीही झाली नव्हती. संपूर्ण जग या कारवाईकडे पाहत आहे. सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर मधील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना खरी श्रद्धांजली ठरत असल्याचे प्रतिपादन राजाभाऊ मुळे यांनी केले.
अहिल्यानगर भाजपच्या वतीने भारतीय सैन्यदलाच्या कामगिरीबद्दल जल्लोष करण्यात आला, त्यावेळी राजभाऊ मुळे बोलत होते. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, निखिल वारे, माजी सभापती मनोज कोतकर, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, मनोज दुल्लम, माजी नगरसेवक रामदास आंधळे, सतीश शिंदे, अजय चितळे, संजय ढोणे, मनोज ताठे, अशोक गायकवाड, करण कराळे, अमित महाराज धाडगे, मितेश शहा, सोमनाथ जाधव, अमोल निस्ताने, माजी नगरसेविका पल्लवी जाधव ,आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये 28 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे अड्डे अक्षरश उद्ध्वस्त करून टाकले, पाकिस्तान देश हा खोटारडा आहे. ते दाखवतात एक आणि करतात एक. नेहमीच भारताला डिवचण्याचे काम करतात.
मोदी सरकारने आणि भारतीय सैनिकांनी अचूक मारा करत पाकिस्तानमधील अतिरेक्यांना धडा शिकविला आहे. त्यामध्ये मरण पावलेल्या अतिरेक्यांना पाकिस्तान सैनिकांकडून मानवंदना दिली जाते ही बाब निंदनीय आहे. खोटे काम करणाऱ्या पाकिस्तानला उत्तर देण्याची गरज आहे. आम्ही भारतीय सैनिकांबरोबर आहोत. त्यांच्या या कामगिरीबद्दल अहिल्यानगर शहर भाजपाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला, भारतीय सैन्य दलाची कामगिरी ही कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
मोदी यांच्या धाडसी निर्णयाचे संपूर्ण जगात स्वागत: वाकळे
पाकिस्तान मधील नागरिकांवर हल्ला न करता सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ही अचूक कारवाई अभिमानास्पद आहे. एवढी मोठी कारवाई यापूव कधीही झाली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाचे संपूर्ण जगात स्वागत होत असल्याचे मत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले.