पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
पारनेर / नगर सह्याद्री
रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी स्वॉलीसिटर गुलाबराव शेळके सभागृह, जिल्हा बँक, पारनेर येथे पारनेर राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय संघटनेच्या ताकदीविषयी विविध मार्गाने होत असलेली कुचंबना मनाला बोचत असल्याचे स्पष्ट करत, तालुकाभारातील कार्यकर्त्यांची जमलेली गर्दी, नव्याने झालेले पक्ष प्रवेश व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपण सर्वांनी एकसंघपणे गावागावांत पक्षबांधणी करून वाटचाल सुरु ठेवल्यास यापुढील काळात राष्ट्रवादीही कुणापेक्षा कमी नसेल असे विश्वासदर्शक उद्गार पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.
संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने बोलविण्यात आलेल्या या बैठकीत मागील महिन्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेल्या पंढरीनाथ उंडे व रमेश वरखडे यांना कार्याध्यक्ष तर वंदना घोलप यांना महिला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. याचवेळी तालुक्यात शेतकरी नेते म्हणुन ओळखले जाणारे अनिल देठे यांसह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार दाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीररीत्या प्रवेश केला.
जिल्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी हरीश काका दावभट, जिल्हा संघटक पदाची जबाबदारी अप्पासाहेब साठे यांच्यावर तर संतोष सालके, अरुण चौधरी, प्रितेश पानमंद, अनिल मदगे, सुभाष ठाणगे, सतिश बागल यांच्यावर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. संतोष आवारी, अमोल रोकडे, भास्कर थोरात, अशोक डेरे यांची सरचिटणीस पदी, शरद गागरे खजिनदार पदी तर शंकर खैरे, अशोक जाधव, विजय दिवटे, राजू औचिते संघटक पदी तर विशाल साळवे यांचीही सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी सुभाष सासवडे उपाध्यक्षपदी सुनील तांबोळी तर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी जयश्री शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष म्हणुन अशोक खैरे, उपाध्यक्ष म्हणुन संतोष शेलार तर सामाजिक न्याय विभाग युवकच्या अध्यक्षपदी आकाश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. ओ.बी.सी. सेलच्या अध्यक्ष पदावर नितीन घोलप यांची तर टाकळी ढोकेश्वर गट अध्यक्षपदी देवराम मगर, टाकळी ढोकेश्वर गण अध्यक्षपदी अक्षय गोरडे, भाळवणी गण अध्यक्षपदी प्रकाश रोह्कले, निघोज गण अध्यक्षपदी वसंत ढवन तर सुपा गण अध्यक्षपदी सुरेश काळे यांची वर्णी लागली. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, माजी नगराध्यक्ष विजय औटी, संदीप कपाळे, भास्कर उचाळे, सुषमा रावडे, अपर्णा खामकर, सोनाबाई चौधरी, सुधामती कवाद, सुभाष सासवडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार दाते यांनी सांगितले की, गेल्या विस वर्षांपासून मी स्वतः उमेदवारीच्या प्रतीक्षेत होतो. शेकडो कार्यकर्ते ‘दाते सर हाच आमचा पक्ष’ असा विश्वास देत असतानाही मी उमेदवारी करण्याच्या उद्योगात पडलो नाही, ज्यावेळी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली त्याचवेळी मी निवडणूक लढलो आणि जिंकलोही. मी नामदार अजितदादा व पक्षाच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता असून पक्षापेक्षा कुणीही मोठा नसतो हे नुसत बोलण्यापुरत नाही तर मी स्वतः त्याप्रमाणे कृती करून दाखवले आहे. पक्षाचा, पक्षाच्या शिस्तीचा व पक्षाच्या नेतृत्वाचा सन्मान आपण प्रत्येकाने राखला पाहिजे.
माझ्या विजयात महायुतीच्या सर्वच घटकपक्षांचा असलेला सहभाग मी कधीही नाकारत नाही व नाकारणारही नाही. उद्याच्या काळात आपल्याला महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जायचे असून महायुतीच्या वाटाघाटीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या जागा सर्वांच्या सामुहिक ताकदीने लढू आणि जिंकूही अशा पद्धतीचे वक्तव्य करत पारनेर महायुती अभेद्यच राहणार असल्याचे संकेतही यावेळी आमदार काशिनाथ दाते यांनी दिले.
राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीतील उपस्थिती, मोठ्या प्रमाणात सुरु असलेले इनकमिग आणि पक्षश्रेष्ठींद्वारे सूक्ष्मअभ्यास करत सुरु असलेली संघटनेची बांधणी याबरोबरच आजच्या बैठकीत सर्वांना विचारात घेवून जुन्या नव्यांचा समन्वय साधत केलेली संघानात्मक बांधणी पाहता उद्याच्या काळात निश्चितच पारनेर राष्ट्रवादीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही.
पारनेर तालुका हा राष्ट्रवादीमय होता, आहे आणि यापुढेही राहणार
राष्ट्रवादीच्या यशाचं श्रेय जर कुणी एकटा बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते कदापीही सहन करणार नाही. विधानसभेच्या विजयातील त्याचं योगदान आम्ही कधीही नाकारलं नाही किंवा ते नाकारण्याच आमचं कुठलेही प्रयोजन नाही. यापुढील काळात पक्षाचं संघटन अधिकच मजबूत करत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतून पारनेर तालुका हा राष्ट्रवादीमय होता, आहे आणि यापुढेही राहणार असल्याचे दाखवून द्यायचे आहे.
प्रशांत गायकवाड, (संचालक जिल्हा बँक)