spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादी अजित पवारांची; शरद पवारांचं काय?, आ. गडाख यांचे जय श्रीराम!

राष्ट्रवादी अजित पवारांची; शरद पवारांचं काय?, आ. गडाख यांचे जय श्रीराम!

spot_img

लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर : नगर मतदारसंघात शरद पवार गटाला सापडेना आश्वासक चेहरा | अजित पवारांशी पंगा कोण घेणार?
सारिपाट / शिवाजी शिर्के – 
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाची याचा फैसला निवडणूक आयोगाने दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांच्या हयातीनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना देण्यात आली. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि त्यांच्यासमोरच त्यांच्याकडून राष्ट्रवादीचा ताबा त्यांच्या पुतण्याकडे सोपवला गेला. शिवसेेनेपाठोपाठ राष्ट्रवादी बाबत निवडणूक आयोगाचा आलेला निकाल बरीच राजकीय समिकरणे बदलणारा आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेना सोपविल्यानंतर ज्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांना सहानुभूती भेटली त्याप्रमाणात शरद पवार यांना ती भेटणार नाही हे वास्तव आहे. सामान्य शिवसैनिकांच्या योगदानातून शिवसेना उभी राहिली असताना राष्ट्रवादी काँग्रेस ही प्रस्थापीत नेत्यांच्या माध्यमातून उभी राहिली हा या दोघांमधील फरक! त्यामुळेच शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात आमदार-खासदार गेले आणि त्यांच्यासोबत त्या-त्या आमदार-खासदारांचे समर्थकही गेले. दस्तुरखुद्द शरद पवार यांना आता पुन्हा नव्याने श्रीगणेशा करावा लागेल आणि जखमी वाघाच्या युक्तीनुसार ते व त्यांचे पाठीराखे किती आक्रमकपणे हे संपूर्ण प्रकरण जनतेसमोर मांडतील यावरच शरद पवार व त्यांच्या समर्थकांचं अस्तित्व अधोरेखीत होणार आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना निवडणूक आयोगाने दिल्यावर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आता अनेक घडामोडी घडण्याची शयता आहे. अजित पवारांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ’राष्ट्रवादी’त काय घडू शकतं? याबाबत काही शयता वर्तवल्या जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून पक्षाच्या कार्यालयासह अनेक गोष्टींवर दावे प्रतिदावे केले जाण्याची शयता आहे.

अजित पवार गट राज्यभरातील पक्षाच्या नावाने असणारी कार्यालये ताब्यात घेण्याची शयता नाकारता येत नाही. सध्या काही कार्यालयं राष्ट्रवादी वेल्फेअर असोसिएशनच्या नावाने देखील आहेत. या असोसिएशनचे शरद पवार हेच अध्यक्ष असल्याने येथे अडचण निर्माण होऊ शकते. मुंबईतील बेलार्ड पियर येथील पक्ष कार्यालय अजित पवार गट ताब्यात घेण्याची शयता आहे. पक्षाच्या नावाने आलेल्या देणग्या, ठेवी देखील अजित पवार गट ताब्यात घेण्याची शयता व्यक्त होत आहे. सोशल मीडियात शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह, नाव वापरता येणार नसताना आता पक्ष कार्यलयावरून संघर्ष पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

शिवसेनेत झालेल्या गटबाजीनंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह दिले होते. यानंतर पुढे दोन्ही गटात अनेक मुद्यावरून वाद पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राज्यभरातील पक्षाचे कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटात संघर्ष देखील पाहायला मिळाला. आता राष्ट्रवादीत देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळण्याची शयता आहे. कारण राज्यातील अनेक महत्वाच्या शहरात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असून, ते आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटासह शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जाण्याची शयता वर्तवली जात आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेला आहे. आता अशा परिस्थितीत शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. म्हणजेच आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे.
आयोगाच्या निर्णयानंतर नगर ज़िल्ह्यात मोठे पडसाद उमटल्यात जमा आहे. जिल्ह्यातील प्राजक्त तनपुरे आणि रोहीत पवार हे दोन आमदार वगळता चार आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. आता चिन्ह आणि पक्षाचा निर्णय झाला असल्याने व पुढे विधानसभा सभापतींचा निकालही असाच येणार असल्याचे अनेकांनी गृहीत धरले असल्याने अजित पवार यांच्यासोबत जाण्याशिवाय या चारही आमदारांना पर्याय राहिलेला नाही.

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे शरद पवार की अजित पवार याबाबतचे तळ्यात-मळ्यात कालपर्यंत चालूच होते. मात्र, निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पक्षाचा ताबा अजित पवार यांच्याकडे गेल्याचे स्पष्ट होताच आ. लंके यांच्या हालचाली जराश्या मंदावल्याचे दिसते. अर्थात, नीलेश लंके हे धाडसी निर्णय घेऊ शकतात आणि अजित पवार यांना सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गोटात जाऊ शकतात, असा कयासही बांधला जात आहे. आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे आणि अकोल्याचे आ. लहामटे हे अजित पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पक्षाचा निर्णय लागला असतानाही नगरच्या जागेवर कोण उमेदवार द्यायचा याचा अद्यापही शरद पवार गटाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर दौर्‍यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार असून त्यात चाचपणी होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, शरद पवार गटाकडे आज तरी लोकसभेसाठीचा आश्वासक चेहरा नाही हे वास्तव आहे. शरद पवार गटाची संपूर्ण भिस्त अजित पवार गटात असणार्‍या नीलेश लंके यांच्यावर आहे. नीलेश लंके हे शरद पवार गटाचे उमेदवार असणार असल्याचा कयास बांधला जात असताना तिकडे अजित पवार यांना दगाफटका करायचा की नाही या द्वीधा मन:स्थितीत लंके सापडले आहेत. अजित पवार यांना दगाफटका करत शरद पवार यांच्या गोटात सामिल झाल्यास भाजपच्या नेतेमंडळींकडून अजित पवार यांच्या भूमिकेबद्दलच शंका उपस्थित होणार आहे. त्याची मोठी किंमत लंके यांना जशी मोजावी लागू शकते तशीच ती अजित पवार यांना देखील मोजावी लागू शकते आणि तसे झाल्यास फारसे आश्चर्य वाटू नये.

जिल्हा काँग्रेसमध्ये डागडुजी; जयंत वाघ होणार जिल्हाध्यक्ष
राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणांच्या जोडीने आता जिल्ह्यातील राजकीय समिकरणे देखील बदलू लागली आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे कोणत्याही क्षणी अजित पवार यांच्या गोटात सामिल होणार आहेत. नागवडे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा दिमाखदार सोहळा येत्या सहा-सात दिवसात होत आहे. तत्पूर्वीच जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवा चेहरा देण्याची रणनिती काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी आखली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी तरुण चेहरा म्हणून जयंत रामनाथ वाघ यांची वर्णी लागणार आहे. वाघ यांच्या नावाची शिफारस आ. थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली असून याबाबत दोन दिवसात अधिकृत घोषणा होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

आ. शंकरराव गडाखांचा शिवबंधनाला जय महाराष्ट्र; जय श्रीरामचा देणार नारा!
अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठींबा देत राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सामिल झालेले व पुढे शिवबंधनात अडकलेले नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवबंधनाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे. गडाख यांना मंत्रीपद आणि जिल्ह्यातील शिवसेनेची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी कायम आपल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत केले. जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा अथवा आमदार-खासदार यांचा रोष त्यांनी ओढवून घेतला नाही. राज्यासह देशातील एकूणच बदललेले राजकारण आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका समजावून घेण्याच्या अनुषंगाने आ. गडाख यांनी निवडक समर्थकांसोबत बैठकांचा सपाटा लावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी जवळीक आणि त्यामाध्यमातून मतदारसंघाला होणारा फायदा याची गोळाबेरीज पाहता आ. गडाख काही दिवसातच भाजपात दाखल झाल्यास आश्चर्य वाटू नये. गडाख यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची नगर जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे.

पाठित खंजीर खुपसणार्‍यांच्या काळजात कट्यार खुपसली!
Prakash Mahajan on Sharad Pawar : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी या निकालानंतर शरद पवार यांच्यावर केलेला हल्लाबोल बोलका आहे. ज्यांनी आयुष्यभर दुसर्‍याच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या काळजात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कट्यार खुपसली असं टीकास्त्र मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर सोडलं. शरद पवारांचे उभे आयुष्य हे दुसर्‍याची घरे फोडण्यात गेले. आम्ही स्वत:ही त्याचे शिकार आहोत. गोपीनाथरावांचे घर फोडतांना शरद पवारांच्या हे लक्षात आले नाही की भविष्यात हा प्रयोग त्यांच्याही बाबतीत होऊ शकतो.

राज ठाकरेंच्या मनसेचा अजित पवारांना दिलसे टोला!
मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजित पवारांवर निशाणा साधला. मनसेने ट्विट करुन म्हटलंय, ‘बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसर्‍याच्या बळावर हिसकावणं सोप्पं आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!’. मनसेने या पोस्टच्या माध्यमातून थेट अजित पवार यांना लगावलेला टोलाही बराचसा बोलका ठरत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...