अहिल्यानगर । नगर सहयाद्री;-
नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी रक्कम बँकेव्दारे दिली जाणार असून, त्यासाठी बँक प्रशासनाने ग्राहक सहायता केंद्र सुरू केले आहे. या केंद्राशी संपर्क साधून ज्यांचे पैसे दिले जाणार आहेत, त्या ठेवीदारांच्या यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री ठेवीदारांनी करण्याचे आवाहन नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केले आहे.
बँकेच्या प्रशासनाने पाच लाखाच्या आतील रकमेच्या ठेवी असलेल्या बहुतांश ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत व आता पाच लाखाच्यावर रकमेच्या ठेवी असलेल्यांना त्यांच्या ठेवींच्या रकमेची निम्मी रक्कम परत केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने त्यासाठी परवानगी दिली असल्याने बँक प्रशासनाने 50 टक्के रक्कम वितरणाबाबत ग्राहक सहाय्यता केंद्र सुरू केले आहे. बँकेने याबाबत आवाहन केले असून, 5 लाखांवरील ठेवींचे वितरण बँक लवकरच सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यासंदर्भातील ठेवीदारांच्या यादीत आपले नाव समाविष्ट आहे की नाही, हे पाहण्यासाठी नगर अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयात सकाळी 10.30 ते सायं. 5 या कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याचे आवाहन बँक बचाव समितीने केले आहे. यासंदर्भात बँक बचाव कृती समितीने स्पष्ट केले आहे की, पाच लाखापुढील म्हणजे 6 डिसेंबर 2021 रोजी ज्यांची मुदतठेव, सेविंग्ज् खाते, चालू खात्यावर पाच लाखापेक्षा जास्त रक्कम होती ते सर्व खातेदार आहेत. याबाबत केवायसी पूर्तता, क्लेम फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याची यादी अंतिमरित्या तयार केली आहे.