अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
महापालिकेच्या करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी मोठी डोकेदुखी ठरत आहे. आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षात १००% थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट दिले असून, त्यासाठी चारही प्रभाग समित्यांमध्ये विशेष पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकांवर वसुलीची जबाबदारी सोपवण्यात येणार असून, थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक श्री.यशवंत डांगे यांनी सांगितले
गाळेधारकांसाठी अंतिम संधी – अन्यथा सीलिंगची कारवाई
महापालिकेने यापूर्वी अनेक वेळा गाळेधारकांना सवलती देऊनही, अद्याप अनेकांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे आता थकीत भाडे वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. गाळेधारकांकडून ठराविक कालावधीत भाडे न भरल्यास, त्यांचे गाळे थेट सील करण्यात येणार आहेत.
वसुलीचे उद्दिष्ट आणि कठोर कारवाई –
आयुक्त श्री.यशवंत डांगे यांनी चालू आर्थिक वर्षात महसूल वाढीवर भर देत १९५ कोटी रुपयांचे मालमत्ता कर आणि २१ कोटी रुपयांचे गाळे भाडे वसुलीचे लक्ष्य निश्चित केले आहे.जानेवारी ते मार्च या कालावधीत करसवलत योजनेमध्ये नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यास संथ गतीने प्रतिसाद दिला.
गतवर्षीची थकबाकी – १६ कोटी ८० लाख रुपये
चालू वर्षातील थकबाकी – ४ कोटी १७ लाख रुपये
एकूण वसुलीचे उद्दिष्ट – २० कोटी ९७ लाख रुपये
या वसुलीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या ३३ व्यापारी संकुलांतील ७४२ गाळेधारकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अनियमितता आणि बेकायदेशीर व्यवहारांवर कारवाई –
आयुक्तांनी गाळेधारकांच्या तक्रारींचा आढावा घेतला असता, मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. अनेक गाळेधारकांनी वर्षानुवर्षे करारनामे नूतनीकरण केलेले नाहीत आणि ते अजूनही जुन्या दराने भाडे भरत आहेत. यामुळे महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे.
पोट भाडेकरूंना बेकायदेशीरपणे जागा देणे –
काही गाळेधारकांनी महापालिकेच्या गाळ्यांवर कुठलीही परवानगी न देता परस्पर १५ ते २० वर्षांचे करार करून लाखो रुपये डिपॉझिट घेऊन जागा भाड्याने दिल्या आहेत. हे गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार असल्याने संबंधित गाळेधारकांवर गुन्हे दाखल करून दंड आकारला जाणार आहे.नागरिकांना देखील आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही गाळेधारकांशी परस्पर व्यवहार करू नयेत. कारण, महापालिकेच्या गाळ्यांवरील मालकी हक्क कायम महापालिकेचाच राहणार आहे.
प्रत्यक्ष चौकशी आणि करार रद्द करण्याची मोहीम –
एप्रिल महिन्यापासून सर्व गाळेधारकांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात येणार आहे. अनधिकृत पोट भाडेकरू असल्यास, त्या गाळ्यांचे करार तत्काळ रद्द करून संबंधित गाळेधारकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
गाळेधारकांसाठी महत्त्वाच्या सूचना
ज्यांनी पोट भाडेकरूंना जागा दिली आहे, त्यांनी ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिकामी करून घ्यावी.
महापालिकेच्या सर्वेक्षणादरम्यान अनधिकृत पोट भाडेकरू आढळल्यास, गाळे तात्काळ सील करण्यात येतील.
ज्यांना गाळ्यांचे भाडे परवडत नसेल, त्यांनी त्वरित गाळे महापालिकेकडे परत करावेत.
विशेष पथकांची जबाबदारी
महापालिकेच्या विशेष पथकांना पुढील जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:
✅ भाडे थकबाकीच्या रकमेप्रमाणे याद्या तयार करणे.
✅ जप्तीच्या कारवाईचे चित्रीकरण करणे.
✅ भाडेकराराची मुदत संपली असल्यास ते नूतनीकरण करणे.
✅ अधिकाऱ्यांनी कर्तव्यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करणे.
महापालिकेच्या संपत्तीचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गाळेधारकांनी लवकरात लवकर थकीत भाडे भरून संभाव्य कारवाई टाळावी.असे आवाहन श्री.यशवंत डांगे यांनी गाळेधारकांना केले आहे