अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण अहिल्यानगरात खळबळ उडाली आहे. ही धमकी त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेस्ट मेसेजद्वारे आली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ (वय ३७, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) हे बुधवारी (दि. २ जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड चौक परिसरात असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एक धमकीचा टेस्ट मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, शिरसाठ यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत सदर मेसेजबाबत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार अमिना शेख करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप चर्चेत होते. अशा पार्श्वभूमीवर त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.