अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या ३०८ कोटी रुपयांच्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे. नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल, अशी माहिती आ.संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ.संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने ३०८ कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाच्या अनुशंगाने आ.जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. नगर शहरातील डीपी रस्ते प्राधान्यक्रमाने होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंत्रालय पातळीवर कायम संपर्कात राहून नगर शहरातील भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले. नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांचा विकास निधी अभावी रखडलेला आहे.
परिणामी शहराचा विस्तार, विकासात अडथळे निर्माण होतात. चांगले रस्ते हे शहराची जीवनवाहिनी असतात. दळणवळण प्रशस्त झाले तर विकास आराखड्याची नियोजनपूर्वक अंमलबजावणी शय होते. नवीन वसाहती निर्माण होतात. मुख्य रस्त्यांभोवती बाजारपेठ उभी राहते. पर्यायाने शहराच्या अर्थकारणाला चालना मिळते. याच गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करीत आ.जगताप यांनी राज्य शासनाकडून डीपी रस्त्यांसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे.
या रस्त्यांसाठी मिळाला निधी
माऊली संकुल, गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १५ कोटी, सर्व मंगल कार्यालय ते भिंगारवाला चौक तीन कोटी ६६ लाख, ज्येष्ठ नागरिक भवन ते सीना नदी रस्ता १२ कोटी ३४ लाख, केडगावमधील जेएलपी रेसिडेन्सी ते पुणे रस्ता सहा कोटी, एकवीरा चौक ते तपोवन रस्ता सात कोटी ६८ लाख, सीआयव्ही कॉलनी रस्ता पाच कोटी १६, इंद्रप्रस्थ कार्यालय ते बुरुडगाव रस्ता १३ कोटी ५० लाख, नक्षत्र लॉन ते वाकोडी रस्ता दोन कोटी ४० लाख, माळीवाडा वेश ते पंचपीर चावडी ते भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक १० कोटी ६७ लाख. पत्रकार चौक-अप्पू हत्ता चौक-न्यू आर्ट्स कॉलेज रस्ता १५ कोटी ७४ लाख, नगर वाचनालय-गांधी मैदान-गाडगीळ पटांगण-अमरधाम पाच कोटी ४० लाख, बोल्हेगावमधील रस्त्यासाठी चार कोटी ९१ लाख, दिल्ली दरवाजा-बागरोजा हडको-नेप्ती नाका चौक रस्ता चार कोटी ५ लाख, जीपीए चौक-धरती चौक-बाजार समिती चौक सहा कोटी ३९ लाख, गोविंदपुरा नाका-पोलिस चौकीपर्यंत रस्ता दोन कोटी ५८ लाख, तपोवन रस्त्यावरील राजामाता जिजाऊ सांस्कृतिक भवनापर्यंतचा रस्ता तीन कोटी २३ लाख, प्रभाग दोनमधील शामसुंदर पॅलेस-हिमंतनगर रस्ता तीन कोटी ११ लाख, सारसनगरमील छत्रपतीनगरपर्यंतचा रस्ता दोन कोटी ३८ लाख, यशोदानगर-सपकाळ रुग्णालय-किंग कॉर्नर रस्ता तीन कोटी ४३ लाख प्रोफेसर कॉलनी-गंगा उद्या रस्ता पाच कोटी ९९ लाख, सीना नदी सुशोभीकरणासाठी १५ कोटी, तर पोलिस अधीक्षक चौक-पत्रकार वसाहत चौकापर्यंत १७ कोटी रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. माळीवाडा बस स्थानकाच्या पुनर्जीवनासाठी १६ कोटी ५० लाख, सावेडी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी, अहमदनगर महाविद्यालय ते सोलापूर महामार्ग आणि त्यावरील पुलासाठी आठ कोटी ५० लाख, पुणे महामार्ग-कल्याण महामार्ग लिंक रस्त्यासाठी विविध टप्प्यात एकूण ४७ कोटी, केडगाव-नेप्ती उपबाजार समिती रस्त्यासाठी २१ कोटी, सावेडी गावठाण-निंबळक बाह्यवळण रस्त्यासाठी पुलासह १३ कोटी, उड्डाणपुलाखालील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्ट्रॉग ड्रेनेजसाठी पाच कोटी, छत्रपती अश्वारूढ पुतळा-माळीवाडा वेस रस्त्यासाठी चार कोटी ७५ लाख मंजूर झाले आहेत.