युवकास मारहाण, बहिणीच्या सासरच्या मंडळींकडून कुटुंबीयांना धमकी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
बोल्हेगाव येथील गणेश चौक परिसरात 10 जून 2025 रोजी रात्री 1.30 च्या सुमारास महिलेला आणि तिच्या भावास मारहाण झाल्याचा प्रकार घडला. यश आदिक भोसले (वय 18) या युवकाने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यश आपल्या आई कविता, बहिण आकांशा व रुतुजा यांच्यासह भाड्याच्या घरात राहतो. आकांशा हिचा विवाह काही महिन्यांपूव राजेश शशिकांत कुमावत याच्याशी झाला असून, ती सध्या माहेरी राहते. घरगुती कारणावरून तिच्या सासरच्या लोकांनी घरात येऊन वाद घातला.
पुजा शशिकांत कुतावंत (नणंद), राजेश कुतावंत (पती), संगीता कुतावंत (सासू) व सिद्धू (पूर्ण माहिती अपूर्ण) या चौघांनी यशच्या घरात प्रवेश करून जोरदार वादावादी केली. यावेळी पुजा हिने यशच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. त्याला गंभीर दुखापत झाली.
याशिवाय सासरच्या इतर व्यक्तींनी यशच्या बहिणीसह त्याच्या आईला लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि जीवे मारून टाकू अशी धमकी देत तेथून पसार झाले. यशला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अमोल गायधनी तपास करत आहेत.