मुंबई । नगर सहयाद्री:-
धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण भारतात आसमानातून मुसळधार पावसाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते, जे २४ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या उत्तरी किनाऱ्यावर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकणार आहे.
या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, वादळी वाऱ्यांचीही शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता बाळगण्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे हवामान आणखी विस्कळीत होऊ शकते.
उत्तर भारतात मात्र, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी आणि हलक्या रिमझिम पावसाची शक्यता असून, या भागातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज आहे.
मुंबईकरांसाठी ऑक्टोबर महिन्यातील उष्णता नंतर पावसामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या ३७ अंश सेल्सियस इतक्या उंचीवर असलेल्या तापमानात पुढील दोन दिवस मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावसामुळे हवामान थंड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत मुंबईत थंडी कायम राहण्याची अपेक्षा आहे.